Hot Posts

6/recent/ticker-posts

कोकाटें प्रमाणे इतर भ्रष्ट नेत्यांचे राजीनामे घ्या-हेमंत पाटील

 कोकाटें प्रमाणे इतर भ्रष्ट नेत्यांचे राजीनामे घ्या-हेमंत पाटील





पुणे (कटूसत्य वृत्त):-

भ्रष्टाचाराचे आरोप झालेले माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारविरोधात सरकारची 'झिरो टॉलरन्स' पॉलिसी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच न्यायाच्या बाजूने ठाम भूमिका घेत निर्णय घेतले असून, हे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण व परिपक्व नेतृत्वाचे द्योतक आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.१९) व्यक्त केले.

कोणताही दबाव न जुमानता व पक्षीय हितसंबंध बाजूला ठेवून घेतलेले निर्णय लोकशाही व्यवस्थेवर जनतेचा विश्वास अधिक मजबूत करतो. कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारणे हे राज्यात भ्रष्टाचाराला मुळापासून आळा घालण्याच्या सरकारच्या भूमिकेचे ठोस उदाहरण आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत सत्तेत आल्यापासून सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. अगोदर धनंजय मुंडे, पार्थ पवारांच्या निमित्ताने अजित पवार आणि आता कोकाटे अडचणीत सापडल्याने सरकारची नाचक्की होतेय.

अशात मंत्रिमंडळात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, अशा सर्व मंत्र्यांना कोणतीही तडजोड न करता तात्काळ घरचा रस्ता दाखवावा. “भ्रष्टाचाराच्या आरोपांवर केवळ चौकशी पुरेशी नाही, तर नैतिक जबाबदारी स्वीकारत कठोर कारवाई झाली पाहिजे,असे आवाहन पाटील यांनी केले.

सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एकमताने कोकाटेंची हकालपट्टी करण्याची घेतलेली ही भूमिका राज्याच्या प्रशासनासाठी सकारात्मक संदेश देणारी आहे.राज्यात स्वच्छ व पारदर्शक प्रशासन प्रस्थापित करण्यासाठी सरकारने अशीच ठाम भूमिका कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त करत पाटील यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments