दुधनी नगरपरिषदेत शिवसेनेचा झंझावात
दुधनी (कटूसत्य वृत्त):- दुधनी नगरपरिषद निवडणुकीत राजकीय इतिहासात नोंद होईल असा निकाल लागला असून, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रथमेश म्हैत्रे हे दणदणीत विजयासह निवडून आले आहेत. विशेष म्हणजे नगरपरिषदेतील २१ पैकी २१ जागांवर शिवसेना उमेदवार विजयी झाले असून, शिवसेनेने संपूर्ण नगरपरिषदेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत आघाडी कायम राखत अखेर नगराध्यक्ष पदावर प्रथमेश म्हैत्रे यांचा विजय निश्चित झाला. निकाल जाहीर होताच दुधनी शहरात शिवसैनिक व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोष करत विजय साजरा करण्यात आला.
या निवडणुकीत विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनतेशी थेट संवाद या मुद्द्यांवर शिवसेनेला मतदारांनी भरभरून कौल दिल्याचे बोलले जात आहे. २१ पैकी २१ जागा जिंकत ‘क्लीन स्वीप’ साध्य झाल्याने दुधनी नगरपरिषदेवर शिवसेनेचे एकहाती नियंत्रण आले आहे.
विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रथमेश म्हैत्रे यांनी दुधनीतील जनतेचे आभार मानत, “हा विजय केवळ माझा नसून संपूर्ण शिवसेना कुटुंबाचा आणि दुधनीकर जनतेचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू,” असा विश्वास व्यक्त केला.
या ऐतिहासिक निकालामुळे दुधनी शहराच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून, आगामी काळात नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

0 Comments