भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम १६३ लागू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२५ दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्याअनुषंगाने नगरपरिषद , नगरपंचायतींची २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया विनाअडवळा व भयमुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद , नगरपंचायत मतदार संघासाठीच्या मतमोजणी कामी २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणीच्या ठिकाणी येणा-या उमेदवारांचे सोबत त्यांचे समर्थक, वाहने, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या करीता सार्वत्रिक नगरपरिषद / नगरपंचायत निवडणुक २०२५ निवडणूकीसाठीच्या मतमोजणीसाठी २१ डिसेंबर २०२५ रोजी खालील नगरपरिषद / नगरपंचायत मतदारसंघासाठीच्या मतमोजणी ठिकाणच्या परीसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे करीता खालील नमुद केलेली कृत्ये करणेस प्रतिबंध करण्याची आवश्यकता असलेचे निदर्शनास आले आहे.
जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ खाली प्रतिबंध अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन असा आदेश दिले आहेत की, सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद,नगरपंचायत मतदार संघनिहाय मतमोजणी ठिकाणच्या परीसरात २१ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ०५.०० वाजलेपासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत खालील कृती करण्यास मनाई करण्यात येत आहे.
१) मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिघाच्या परीसरात मतमोजणी कर्मचारी/पुरवठादार, उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरीक्त कोणाही व्यक्तिला प्रवेश करणेस मनाई आहे.
२) मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय रस्त्यावर, व्यासपिठावर किंवा फिरत्या वाहनावर बसविणेस मनाई आहे.
३) आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे/चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करणेस मनाई आहे.
४) मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिघाच्या परिसरामध्ये मोटरगाड्या, वाहनांचा वापर करणे अथवा थांबविणेस मनाई आहे. व खाजगी वाहने ही निश्चित केलेल्या वाहन तळावरच लावण्यात यावीत. (निवडणूकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकिय वाहने वगळून.)
५) मतमोजणी ठिकाणाच्या २०० मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक सहित्य बाळगणे, वापरणेस मनाई आहे.
मा. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी वगळून.)
६) मतमोजणी ठिकाणी उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी या इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणेस मनाई आहे.
७) मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने (शस्र अधिनियम १९५९ व नियम २०१६ मधील तरतुदी प्रमाणे) कोणत्याही प्रकारची शखे, अग्नी शत्रे व दारुगोळा इ. चा वाहतूक, जवळ बाळगणे अथवा वापर करणेस मनाई आहे. (सुरक्षेच्या कारणास्तव नेमले पोलीस अधिकारी/कर्मचारी वगळून.)
८) इंन्स्ट्राग्राम, व्हॉटस्अॅप, व्टिटर, फेसबुक, इत्यादी समाज माध्यमाद्वारे जातीय तणाव निर्माण करणा-या गोष्टी पसरवण्यास मनाई करण्यात येत आहे.
९) मतमोजणी ठिकाणाच्या २०० मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजवणे, गाणी वाजविणे, गाणी म्हणणे, गुलाल उधळणेस, वाहनांच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठ्याने आवाज करण्यास, गुलाल, रंग उधळणे अशा प्रकारचे गैरशिस्त वर्तन करण्यास मनाई करणेत येत आहे.
१०) कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणा-या मजकूराचे फ्लेक्स, बोर्डस व आक्षेपार्ह घोषणा देण्यास मनाई करणे येत आहे.
या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ प्रमाणे तसेच मतमोजणीसाठीच्या गोपनियतेचा भंग झालेस लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) अन्वये तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे.
0 Comments