नाळेवस्ती शाळेस पालकांकडून एलईडी टीव्हीची भेट
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाळेवस्ती येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी वेदांत स्वप्निल नाळे यांच्या पालकांनी शाळेस एलईडी टीव्ही भेट देत आधुनिक शिक्षणाला हातभार लावला.
सध्याच्या तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आकर्षक शिक्षण मिळावे, तसेच मराठी शाळा टिकून राहाव्यात यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. या उद्देशाने ही भेट देण्यात आली असल्याचे पालकांनी सांगितले.
तसेच वेदांतच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दहा स्कूल बॅग व वह्या असे शैक्षणिक साहित्य साई झेरॉक्स व बुक डेपो यांच्या वतीने भेट देण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री कुबेर मॅडम, उपशिक्षिका सुमन कुटे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाराम नाळे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी पालकांच्या या उपक्रमाचे कौतुक करत शाळेच्या वतीने आभार मानले. समाजातील इतर घटकांनीही अशा उपक्रमातून शैक्षणिक कार्यात योगदान द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

0 Comments