प्रभाग १६ मध्ये निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी मिळणार
पक्षाची बदनामी करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक १६ (ड) मध्ये शिवसेनेच्या उमेदवारीबाबत पसरवली जात असलेली अफवा ही पूर्णतः निराधार असून, निष्ठावंत शिवसैनिकालाच पक्ष उमेदवारी देणार असल्याचा ठाम विश्वास प्रभागातील शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे. गेल्या आठ वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठावंत पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेले अमित भोसले हे प्रभाग १६ (ड) मधून इच्छुक उमेदवार असून, त्यांच्या कार्याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे.
अमित भोसले हे गेल्या ०८ वर्षांपासून शिवसेनेत विविध पदांवर काम करत असून, मागील ०४ वर्षांपासून ते प्रभाग १६ मधील पॅनल प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पक्षाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करत त्यांनी विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. शिवसेनेच्या ध्येय-धोरणांशी प्रामाणिक राहून त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
प्रभाग १६ मध्ये सामाजिक बांधिलकी जपत अमित भोसले यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन, रामनवमीच्या निमित्ताने दीपोत्सव, तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी बसण्याच्या बेंचचे वाटप अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांमुळे ते नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे.
दरम्यान, प्रभाग १६ मधील उमेदवारीसाठी पैसे घेऊन काही विशिष्ट व्यक्तींना तिकीट दिले जाणार असल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवली जात असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. ही अफवा पूर्णतः खोटी असून, आमचे जिल्हा प्रमुख अजय दासरी तसेच उपनेत्या अस्मिता ताई हे निष्ठावंत, कार्यकर्त्यांतून उभे राहिलेले आणि सर्वसामान्य शिवसैनिकालाच उमेदवारी देतील, असा विश्वास अमित भोसले व त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
ही अफवा शिवसेनेची प्रतिमा मलिन करण्यासाठी तसेच पक्षातील प्रामाणिक पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांनी रचलेले षड्यंत्र असल्याचेही बोलले जात आहे. अशा चुकीच्या प्रचारामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, याचा निषेध प्रभागातील कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
शिवसेना ही कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवणारी आणि निष्ठेला महत्त्व देणारी संघटना असून, तळागाळातील कार्यकर्त्यालाच संधी देण्याची परंपरा पक्षाने कायम जपली आहे. त्यामुळे प्रभाग १६ (ड) मधूनही निष्ठावंत शिवसैनिक अमित भोसले यांनाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास शिवसैनिक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
0 Comments