सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) सज्ज! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 11, 2025

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) सज्ज!

 सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) सज्ज!

“अब की बार ५० पार” – विकासाच्या बळावर सत्तेची घोषणा

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंगळवारी दुपारी पार्क चौक येथील शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या कार्यालयात पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व प्रभागांमध्ये संघटनात्मक बैठकांचे वेळापत्रक ठरविण्यात आले असून, आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद ठसविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीत “अब की बार ५० पार” हा नारा देत, सोलापूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला. पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकमताने ठरविले की, सर्वधर्मीय आणि सर्वसमावेशक उमेदवारांना संधी देऊन सोलापूरच्या विकासासाठी व सत्तेच्या दिशेने ठोस पावले उचलली जातील.

विकासाच्या बळावर निवडणूक रणधुमाळी

सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मागील काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचे सांगण्यात आले. या निधीतून पिण्याचे पाणी, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था यांसारखी मूलभूत कामे पूर्ण झाली असून, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास हा या कालखंडातील मोठा टप्पा ठरला आहे.

तसेच पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकाळातही शहरातील अनेक प्रभागांमध्ये ठोस विकासकामे करण्यात आली. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनतेसमोर “विकासाचा ठसा” दाखवत राष्ट्रवादी अजित पवार गट जनतेचा विश्वास पुन्हा जिंकणार आहे, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

संघटनात्मक रणनीती ठरली

आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार आणि विद्यमान नगरसेवकांची सांगड घालून स्थानिक पातळीवरील संघटन मजबूत करण्याचे धोरण ठरविण्यात आले. बैठकीत शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले,

 “सोलापूरच्या जनतेला आमच्या कामांची जाण आहे. विकासाच्या आधारे आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली या वेळी सत्तेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही.”

 उपस्थित मान्यवर

या बैठकीला शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, नेते आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, माजी सरचिटणीस प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, महिला अध्यक्षा संगिता जोगदनकर, युवक अध्यक्ष सुहास कदम, माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर, गणेश पुजारी, वाहिदा शेख, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाफ, प्रदेश सचिव इरफान शेख, अल्पसंख्याकचे राष्ट्रीय सचिव फारूक मटके, तसेच अविनाश भडकुंबे उपस्थित होते.

या बैठकीनंतर सोलापूरच्या राजकारणात राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, आगामी काही दिवसांत शहरातील प्रत्येक प्रभागात सभा आणि कार्यकर्ता बैठकांचा धडाका लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages