अॅड. साळुंखे राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षापदी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 11, 2025

अॅड. साळुंखे राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षापदी

 अॅड. साळुंखे राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षापदी 

मंगळवेढा (कटूसत्य वृत्त) :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या महिला विभागाला नवी ऊर्जा देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अॅड. कोमल अजय साळुंखे (ढोबळे) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे सोलापूर जिल्ह्याला राज्य पातळीवर नवं नेतृत्व लाभलं आहे.

ही नियुक्ती पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रोहिणी एकनाथ खडसे यांनी जाहीर केली. अॅड. साळुंखे यांनी आपले नियुक्तीपत्र माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते स्वीकारले. या प्रसंगी पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

मंगळवेढ्यातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित संवाद मेळाव्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांबाबत नियोजन करण्यात आले. याच कार्यक्रमात अॅड. साळुंखे यांना औपचारिकरित्या जबाबदारी सोपवण्यात आली.

आपल्या प्रतिक्रियेत अॅड. साळुंखे म्हणाल्या, “शरद पवार आणि वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासाखाली मला काम करण्याची संधी मिळाली आहे. आमच्या कुटुंबाची राजकीय वाटचाल ही साहेबांच्या सावलीत सुरू झाली, आणि आज या वटवृक्षाच्या छायेत सेवा करण्याचा मान मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे. पक्षातील सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन.”

अॅड. साळुंखे या माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या असून, त्या बहुजन रयत परिषद संघटनेच्या माध्यमातून राज्यभर कार्यरत आहेत. सोलापूर जिल्ह्यात तळागाळातील जनसंपर्क आणि संघटन कौशल्यामुळे त्यांना ही जबाबदारी दिल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.

या कार्यक्रमाला माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष अनिल सावंत, उद्योगपती राहुल शहा, तसेच ओबीसी, युवा, अल्पसंख्याक आणि महिला विभागाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्याचे आयोजन मंगळवेढा तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच सर्व सेलच्या वतीने करण्यात आले होते. या निमित्ताने अॅड. कोमल साळुंखे यांच्या नियुक्तीचे पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले असून, सोलापूर जिल्ह्यात नवे उत्साह आणि बळ आल्याचे राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages