Hot Posts

6/recent/ticker-posts

संकटकाळी माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम इंडियन रेड क्रॉस सोसायटीने केले - पालकमंत्री गोरे

 संकटकाळी माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम इंडियन रेड क्रॉस सोसायटीने केले - पालकमंत्री गोरे




बार्शी (कटूसत्य वृत्त):- इंडियन रेड क्रॉस सोसायटी बार्शीच्या वतीने बार्शी तालुक्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त बाधित 1200 लाभार्थ्यांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, इंडियन रेड क्रॉसचे सचिव अजित कुंकूलोळ, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार एफ.आर.शेख, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे,शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव, माजी नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, इंडियन रेड क्रॉसचे उपाध्यक्ष डॉ. विक्रम निमकर संतोष सूर्यवंशी, अशोक डहाळे, डॉ. दिलीप कराड, अतुल सोनिग्रा, प्रतापराव जगदाळे, प्रशांत बुडून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविकात बोलताना अजित कुंकूलोळ यांनी इंडियन रेड क्रॉस शाखा बार्शीच्या कार्याची माहिती मान्यवरांना दिली. 1974 साली स्थापन झालेल्या बार्शी शाखेच्या मार्फत सर्वप्रथम ब्लड बँक व मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी शाळेची स्थापना झाली. ब्लड बँकेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचे काम केलेआहे. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात आपत्कालीन परिस्थिती, दुष्काळ परिस्थिती, पूर पूरपरिस्थिती, आग लागणे, 1993 चा किल्लारीचा भूकंप, अशा संकटकाळी परिस्थितीत इंडियन रेडक्रॉसने मदत केलेली आहे. 2006-07 साली सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर व अक्कलकोट येथे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत दोन ते तीन हजार कुटुंबाला संस्थेच्या स्वयंसेवकांनी मुक्काम मुक्कामी राहून मदत केलेली त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर आमच्या शाखेच्या कार्याची दखल घेत हाँगकाँग कडून संपूर्ण देशातून बार्शी शाखेची निवड होऊन 50 लाख रुपयांची मदत हॉंगकॉंग कडून मिळालेली आहे. यातून कांदलगाव व कासरवाडी येथे महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला. बार्शी शहरात 2007 साली तळ्याच्या सांडवा फुटून बार्शी शहरात पाणी शिरले होते, त्यावेळी सुद्धा इंडियन रेड क्रॉसने मदत केली. त्याचबरोबर 14 वर्षे सातत्याने पंढरपूर वारीमध्ये वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचे काम इंडियन रेड क्रॉसच्या वतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, सामाजिक जाणीव व भान असणारी इंडियन रेड क्रॉस सोसायटी ही आपत्तीच्या काळात लोकांच्या मदतीला येते हे कौतुकास्पद आहे. संकटकाळी लोकांच्या पाठीशी उभे, राहून, संकटकाळी माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम इंडियन रेड क्रॉसने केले आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीत महाराष्ट्रात आत्तापर्यंतची सर्वात मोठी मदत या संस्थेकडून झालेली पहावयास मिळते. संकट समयी आधार देण्याच्या इंडियन रेडक्रॉस संस्थेच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत व कौतुक केले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी 31 हजार 500 कोटींची भरीव मदत शेतकऱ्यांना केलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी व जनतेच्या पाठीशी उभे राहून व एनडीआरएफ च्या निकषाच्या पुढे जाऊन महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेला मदत केली आहे.

पालकमंत्र्यांची घोषणा
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीने बाधित झालेल्या 30 हजार कुटुंबाला दिवाळीत मदत करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. या 30000 कुटुंबाची दिवाळी गोड होण्यासाठी मेणबत्ती, पणती पासून ते लागणा-या डाळी,  किराणा व इतर साहित्य  बाधित कुटुंबांना पोहोचविले जाईल अशी घोषणा त्यांनी केली.

अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या काळात माजी आमदार राजेंद्र राऊत हे माझ्या दररोज संपर्कात होते, दिवसातून दोन ते तीन फोन करून तालुक्यातील संपूर्ण माहिती मला देत होते व मदतीसाठी काय करता येईल याबाबत चर्चा करत होते. बार्शीतील प्रश्नांसाठी सतत हजर राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलेले आहे. त्या ठिकाणी आपले आमदार हे राजेंद्र राऊत आहेत हे समजूनच तालुक्यातील जनतेला प्रत्येक वेळी मदत केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना माजी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, मानवता धर्म मानून इंडियन रेड क्रॉस सोसायटीने शेतकरी बांधवांना मदत केलेली आहे. संकटात व आपत्तीच्या घटनेत नेहमी इंडियन रेड क्रॉस व त्यांचे सहकारी धावून जातात. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठी पालकमंत्री आवर्जून या कार्यक्रमासाठी आले आहेत. संकटात व दुःखात असलेल्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पालकमंत्री या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे बार्शीतील अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना रोख रक्कम व धनादेशच्या स्वरूपात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देत आहेत त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या वतीने 1 कोटी 51 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार असल्याचे राऊत म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments