Hot Posts

6/recent/ticker-posts

स्व. आबासाहेबांच्या बंगल्यावर म्हणजेच तालुक्याच्या न्याय मंदिरावर हल्ला- आ. बाबासाहेब देशमुख

 स्व. आबासाहेबांच्या बंगल्यावर म्हणजेच तालुक्याच्या न्याय मंदिरावर हल्ला- आ. बाबासाहेब देशमुख





 व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

सांगोला (कटूसत्य वृत्त):- स्व. आमदार गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. ११) सांगोला तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

यावेळी झालेल्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी सामील होऊन त्यांनी घटनेचा निषेध नोंदविला.

या निषेध मोर्चामध्ये बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, दिवाळीच्या तोंडावर बंदची हाक देणे उचित नव्हते, परंतु लोकांच्या भावना तीव्र असल्याने हा निर्णय झाला. स्व. आबासाहेबांच्या बंगल्यावर म्हणजेच तालुक्याच्या न्याय मंदिरावर हल्ला झाला आहे. हा सांगोला तालुक्याच्या इतिहासातील न पुसणारा काळा डाग आहे. ज्यांनी आमच्या न्याय मंदिरावर हल्ला केला आहे त्याला पोलिसांनी ताबडतोब शोधून काढावे. परंतु त्याचे नाव जाहीर न करता त्याला समज देऊन सोडावे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझ्या विविध सहकारी आमदारांनी या घटनेचा निषेध नोंदवीत आम्ही तुमच्या सोबत असल्याचेही आमदार डॉ. देशमुख यांनी सांगितले.

डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगितले, "गणपतराव देशमुख यांची वास्तू ही तालुक्याच्या विकासाची साक्ष आहे. गेल्या साठ वर्षांत कोणीही तिथे एक खडा फेकला नाही. ही घटना तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाला काळी छाया देणारी आहे. ज्यांचे जे कर्म आहे, ते त्यांना भोगावे लागेल.

मोर्चात ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, अतुल पवार, तुषार इंगळे, नंदकुमार शिंदे, अरविंद केदार, कल्पना शिंगाडे, किरण सरगर आदींची उपस्थिती होती. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

स्व. आबांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक

शुक्रवारी (ता. १०) स्व. गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी अज्ञाताने दारूची बाटली फेकून हल्ला केला होता. शनिवारी सकाळी नऊ वाजता कार्यकर्त्यांनी स्व. 'भाई' गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून परिसरात गोमूत्र शिंपडून स्वच्छता केली. त्यानंतर महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात आला. 'भाई गणपतराव देशमुख अमर रहे', 'हल्ला करणाऱ्यांचा निषेध असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Reactions

Post a Comment

0 Comments