मोहोळ नगरपरिषद निवडणुक
शहराच्या दक्षिण भागात राजकीय हालचाली वाढल्या
प्रभाग १० मधून लेंगरे परिवारातील सारिका सागर लेंगरे यांच्या उमेदवारीची चर्चा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहराच्या दक्षिण हद्दवाढ भागात झपाट्याने विकासाच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे युवा नेते सागरदादा लेंगरे आणि लेंगरे परिवाराने मोठी पूर्वतयारी सुरू केली आहे. यापूर्वी सोळा आणि सतरा या प्रभागांचा संयुक्त समावेश होऊन नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग दहा मध्ये सर्वसाधारण आणि ओबीसी महिला आरक्षणाची सोडत निघाल्यामुळे ओबीसी महिला प्रवर्गातून सागरदादा लेंगरे यांच्या सुविद्य पत्नी सारिका सागर लेंगरे या निवडणूक लढण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील भैय्या क्षीरसागर यांचे निकटचे सहकारी असणारे सागरदादा लेंगरे हे भारतीय जनता पक्षात गेल्या पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारभाऊ गोरे, भाजपाचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते आ.सुभाषबापू देशमुख, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण या नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या सागर लेंगरे आणि त्यांचे लहान बंधू युवा उद्योजक समाधान लेंगरे प्रभागातील जनसंपर्क गेल्या नऊ वर्षापासून कायम ठेवला आहे. शिवाय या प्रभागात त्यांच्या परिवाराचा कौटुंबिक नातेसंबंधाचा स्नेह विस्तृत असल्यामुळे त्यांच्या संपर्क सातत्याचा मोठा फायदा त्यांच्या विजयासाठी त्यांना होणार आहे. शिवाय या प्रभागातून यापूर्वीचे प्रभाग सोळाचे नगरसेवक तथा युवा नेते सुशील भैय्या क्षीरसागर हे देखील निवडणूक लढवणार असल्याने सुशील भैय्या क्षीरसागर आणि सागरदादा लेंगरे या दोन युवा नेत्यांच्या जोडीमुळे या प्रभागातील भाजपा महायुतीचे पारडे आणखी जड होणार आहे.
चौकट
यशस्वी युवा उद्योजक तथा युवा नेते सागरदादा लेंगरे हे विविध क्षेत्रातील सक्रियतेमुळे मोहोळ तालुक्याच्या आणि शहराच्या विविध समाज घटकांशी गेल्या अनेक वर्षापासून संपर्कात आहेत. मात्र सोशल मीडिया सेलच्या माजी जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळल्यामुळे प्रभावी प्रचार यंत्रणा आणि संपर्कस्थाने बळकट करण्यामध्ये त्यांचा मोठा हातखंडा आहे. सागर लेंगरे यांच्या सुविद्य पत्नी सारिका लेंगरे यांच्या उमेदवारीमुळे गेल्या अनेक वर्षापासूनचा बालेकिल्ला असलेल्या भाजपच्या या प्रभागातील राजकारण आणखी जास्त ढवळून निघणार आहे.
0 Comments