ना कोणत्या पक्षावर ना कोणत्या चिन्हावर मोहोळची निवडणूक मतदारांच्या मनावर
कोण गुलाल उधळणार ? आणि कोण घरी बसणार ?
मोहोळ नगरपरिषद रणधुमाळी
भाग एक
मोहोळ (साहिल शेख):- मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण प्रक्रियेचा झटका बसल्याने शहरातील अनेक दिग्गज आता नगराध्यक्ष पदाची स्वप्ने विसरून किंगमेकर होण्याच्या तयारीत आहेत. काही किंगमेकर निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहून सूत्रे सांभाळणार आहेत तर काही किंगमेकर स्वतःच निवडणूक लढवून नगर परिषदेतील आपले अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
जसा काळ बदलला तसा राजकारणाची व्याख्या बदलली आणि निवडणुकीचीही. एकेकाळी पुढील प्रमाणे स्तर असायचे. हाय कमांड त्यानंतर वरिष्ठ नेते त्यानंतर स्थानिक नेते त्यानंतर कार्यकर्ते त्यानंतर समर्थक आणि त्यानंतर मतदार. आता अलीकडच्या काळातील नव्याने समाविष्ट झालेला स्तर म्हणजे कोणतेही पक्ष धोरण नसलेले, सामाजिक भान नसलेले, केवळ राजकारणात काहीतरी मिळतेय म्हणून केवळ आभासी भूमिकेत राहून सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडून घेणारा एक आभासी कार्यकर्ता घटक बनला आहे.
ग्रामपंचायत लोप पावुन नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर नगरसेवक म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल बनल्यामुळे त्यावेळी नगरसेवक होण्यासाठीची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. ग्रामपंचायत कालावधीमध्ये देखील ग्रामसेवकांना हाताशी धरून दप्तर घरी नेऊन मागच्या तारखेचे बांधकाम परवाना वाटणाऱ्या अनेक सरपंच,उपसरपंचांनी नगरपरिषद निवडणुकीचा खर्च काढला. काही कायम इच्छुक नगरसेवक राहिले तर काही नगरसेवक बनले. सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये नगरसेवक केवळ एकमेकांच्या तोंडाकडे बघत अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून प्रशासन व्यवस्थेचा आणि ठेकेदारी कार्यपद्धतीचा अभ्यास करू लागले. सुरुवातीच्या काळात आलेल्या अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना फारसे साक्षर न करण्याची भूमिका घेतल्यामुळे ठेकेदारीची व्यवस्था आणि कामे मंजूर करून आणण्याची ती पूर्ण करण्याची आणि बिले काढण्याची सिस्टीम कळण्यासाठी नगरसेवकांना नंतरचे अडीच वर्ष लागली. मोहोळ शहरातील कानाकोपऱ्यातील काँक्रीटचे रस्ते गटार कामे पेव्हर ब्लॉक त्याचबरोबर अंतर्गत सुशोभीकरण देखील झाले. विशेष म्हणजे काही नगरसेवकांनी आपला प्रभाग अद्यावत आणि विकासकामाने समृद्ध बनवला देखील. त्यामुळे स्थानिक मतदारांना नगरपरिषदेत जाण्याची वेळ आली नाही. ज्या ज्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील संपर्क कायम ठेवत मतदारांना विश्वासात घेत चांगली कामे केली. त्यांना आता पुन्हा कोणत्याही नव्या जाहीरनाम्याची अथवा पब्लिसिटी प्रपोगंडा करण्याची गरज उरली नाही.
चौकट १
पक्ष गट तट सत्ता राजकारण चिन्ह, उजवा,डावा समर्थक, विरोधक या गोष्टी होतच राहतील. मात्र शहरातील सुजाण मतदारांना आपल्या प्रभागात काम करणारा नगरसेवक हा सुशिक्षित, चांगल्या वैचारिक धोरणाचा, चांगली विचारधारा मनामध्ये असलेला, प्रशासन स्तरावर उत्तम समन्वय असलेला, शिवाय सर्वधर्मसमभाव आणि जातीय सलोखा बंधुता राखणारा असावा असे वाटणे साहजिक आहे. तरीही आरक्षण सोडतीनंतर जातीची समीकरणे आणि कोणत्या समूहाला अनुकूल वातावरण आहे कोणत्या समाजाचे मतदान कोणत्या बाजूने जाईल याचे आडाखे बांधत होणारी मतदानाची रणनीती निश्चितपणे मनाला विचार करायला लावणारे आहे.
चौकट २
सुरुवातीपासूनच हि निवडणूक कोणत्या पक्षाच्या मुद्द्यावर, कोणत्या चिन्हावर, कोणत्या जाती धर्मावर, कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर लढली जाणारच नाही, तर ही निवडणूक लोकांना रुचणाऱ्यांना विजयी करणारी, लोकांना खुपणाऱ्यांना पाडणारी, आणि लोकांना टोचणाऱ्यांना डिपॉझिट जप्त करायला लावणारी ठरणार आहे.
आजही शहरात काही चांगले नगरसेवक असे आहेत त्यांना पक्षापुढेच काय मात्र मतदारापुढे देखील हात जोडायची गरज नाही. कारण त्यांनी वेळोवेळी ऊन पावसात दिवस रात्र सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका तर घेतलीच, मात्र प्रापंचिक खर्चातील चार दोन पैसे देखील प्रभागातील सर्वसामान्यांच्या हितासाठी खर्चण्याची जी दानत दाखवली आहे ती दानतच त्यांना या निवडणुकीत सर्वात कमी खर्चात निवडून यायला फायदेशीर ठरणार आहे.
0 Comments