Hot Posts

6/recent/ticker-posts

लाडक्या बहिणींच्या 'ई-केवायसी'ला ब्रेक, तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल बंद

 लाडक्या बहिणींच्या 'ई-केवायसी'ला ब्रेक, तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल बंद  



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींना आता ई-केवायसी बंधनकारक केली आहे. लाभार्थी महिला विवाहित असल्यास पती आणि अविवाहित असल्यास वडिलांची पण ई-केवायसी करायची आहे.मात्र,https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया थांबली आहे. आता दिवाळीपूर्वी योजनेचा हप्ता मिळणार की नाही, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे.
लाडकी बहीण योजनेत सुरवातीला सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिला होत्या. पण, राज्य सरकारने चारचाकी वाहने असलेल्यांची नावे वगळली. त्यानंतर एकाच रेशनकार्डवरील दोनपेक्षा जास्त लाभार्थी देखील कमी केले. याशिवाय वय कमी-अधिक असलेल्या महिलांसह केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्यांचाही लाभ बंद केला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख महिलांचा लाभ कायमचा थांबला आहे.

आता कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या अनुषंगाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या प्रक्रियेत लाभार्थींना त्यांची काही महत्त्वाची कागदपत्रे, माहिती पुन्हा अपलोड करावी लागणार आहेत. त्यात लाभार्थीचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्न व आधार कार्डची माहिती द्यायची आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' या वेब पेजवर लाभार्थींचा आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढचा लाभ मिळणार नाही, असे अधिकारी सांगत आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. मात्र, सुरवातीला निकषांकडे दुर्लक्ष करून लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि आतापर्यंत लाभ देखील घेतला. मात्र, आता ई-केवायसीनंतर अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. याची धास्ती लाडक्या बहिणींना आहे.


चौकट
 
ई-केवायसी करावीच लागणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ई-केवायसी करावी लागणार आहे. पण, सध्या त्या वेब पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी असून त्यात सुधारणा केली जात आहे. त्यानंतर सर्व लाभार्थींना ई-केवायसी करावी लागेल. तोपर्यंत लाभ मिळेल की नाही याबद्दल सांगता येणार नाही.
  - प्रसाद मिरकले, महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर 

Reactions

Post a Comment

0 Comments