Hot Posts

6/recent/ticker-posts

आठ वर्ष गाडीच्या काचा खाली न करणारे आता प्रभागात फिरत आहेत

 आठ वर्ष गाडीच्या काचा खाली न करणारे आता प्रभागात फिरत आहेत




प्रभाग ९ ची स्थानिक अस्मिता जपण्यासाठी आणि पूर्णवेळ प्रभागसेवा करण्यासाठी निवडणूक लढवणार

उत्तरेश्वर तथा सुदाम शिंगाडे यांची घोषणा

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या दहा वर्षापासून मोहोळ शहरातील सर्वाधिक गैरसोयी असलेला प्रभाग म्हणून यापूर्वीच्या चौदा आणि आता या प्रभागाचा समावेश झालेल्या प्रभाग नऊ कडे पाहिले जाते. या प्रभागातून प्रतिनिधित्व केलेल्या अनेकांना या प्रभागाने भरभरून मतदान दिले. मात्र त्या बदल्यात या प्रभागातील जनतेला त्या प्रतिनिधींनी काय दिले ? याबाबत आत्मचिंतन करावे. प्रभागाच्या जीवावर मोठे झालेल्यांनी विकास कामांबाबत प्रभागाला लहानच ठेवले आहे. त्यामुळे यापुढील काळात या प्रभागातील स्वाभिमानी जनता आयात केलेला आणि कोणत्याही पक्षाने लादलेला उमेदवार स्वीकारणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. स्थानिक प्रभागातील मायबाप बंधू-भगिनींनी संधी दिल्यास या प्रभागातून स्थानिक अस्मिता जपण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे घोषणा सामाजिक कार्यकर्ते उत्तरेश्वर तथा सुदाम शिंगाडे यांनी केली.

मोहोळ शहराच्या दक्षिण हद्द वाढ भागातील प्रभाग नऊ मधील वातावरण आता चांगलेच तापले आहे. आरक्षण सोडत होण्यापूर्वी प्रभागाकडे न फिरकणारे अनेक जण या प्रभागाचे क्रमांकाचे स्टेटस ठेवून आता आपणच लढवणार आणि जिंकणार आहोत अशा वल्गना मतदार बंधूभगिनींना विश्वासात न घेता करत आहेत. प्रभागासाठी पूर्णवेळ काम करणारा नगरसेवक हवा आहे. जो प्रभागातील सर्वसामान्यांना सातत्याने संपर्कात ठेवून मूलभूत सुविधा आणि प्रभागातील ज्वलंत प्रश्न सोडवू शकेल. एरव्ही गाडीच्या काचा देखील खाली न करणारे आता प्रभागातून फिरताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता यांच्या पार्टटाइम राजकारणाला वैतागली असून आता स्थानिक अस्मिता जपण्यासाठी मी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रभागातील जनताच या प्रभागातील पूर्ण वेळ काम करणारा नगरसेवक ठरवणार असल्यामुळे या जनतेच्या पाठबळावर मी निवडणूक लढवणार आहे असेही यावेळी उत्तरेश्वर शिंगाडे म्हणाले.

चौकट
या भागातील टोपलंभर मुरूम टाकण्यासाठी देखील आम्हाला नगर परिषदेमध्ये पायपीट करावी लागली. गटारीच्या नावाखाली उखडून टाकलेले रस्ते, तुंबलेल्या ड्रेनेजमधून पसरणारी रोगराई या नरकयातना आम्ही गेल्या दहा वर्षापासून भोगत आहोत. निवडणुकीची लोकशाही मार्गाने लढवली जाणे अपेक्षित आहे. मात्र हा प्रभाग जणू काय आपले संस्थान असून आपणच या भागाचे संस्थानिक असल्याचा अविर्भावात असलेल्या हौशी उमेदवारांना या प्रभागातील जनता धडा शिकवेल असा आम्हाला विश्वास वाटतो .

उत्तरेश्वर तथा सुदाम शिंगाडे 
इच्छुक उमेदवार 
प्रभाग क्रमांक नऊ

Reactions

Post a Comment

0 Comments