सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं निलंबन
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला.
यानंतर आता बार कौन्सिल ऑफ इंडियाने वकील राकेश किशोर यांना प्रॅक्टिसमधून निलंबित केले आहे. सत्तरच्या जवळपास वय असलेल्या या वकिलाने पोलिसांना सांगितले की, सरन्यायाधीशांनी खजुराहो मंदिरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे तो नाराज होता.
एका पोलीस अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले की, "तो एक कागदही घेऊन आला होता, ज्यावर त्याने ‘सनातन धर्म का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान’ असे लिहिले होते.”
या वकिलाची तीन तास चौकशी करण्यात आली. “मात्र, त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही कारण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यालयाने कोणतेही गुन्हा दाखल केला नाही आणि वकिलास सोडून देण्यास सांगितले. त्याचा बूट आणि कागदपत्रे देखील परत करण्यात आली,” असेही अधिकाऱ्याने सांगितले.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
हा वकील सरन्यायाधीशांच्या दिशेने धावून गेला आणि तो पायातला बूट काढू लागला. त्याचवेळी न्यायालयातील सुरक्षारक्षक त्याच्या दिशेने धावले. तो वकील बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावणार इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि न्यायालयाबाहेर नेलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. "सनातन का अपमान… नहीं सहेगा हिंदुस्तान…" , अशा घोषणा या वकिलाने यावेळी दिल्या. त्याला न्यायालयाबाहेर नेत असताना देखील त्याची घोषणाबाजी चालू होती.
गवई नेमकं काय म्हणाले होते?
मध्य प्रदेशातील खजुराहो येथे असलेल्या जवारी मंदिरातील भग्नावस्थेतील सात फूट उंच भगवान विष्णूची मूर्ती पुनर्निर्मित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश म्हणाले, "जर तुम्ही खरे विष्णूभक्त असाल तर प्रार्थना करा, ध्यानधारणा करा. देवाला स्वतःलाच विचारा की काही करावे." याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मूर्तीचे छायाचित्र दाखवत सांगितले की, मूर्तीचे शिर तुटलेले आहे व त्याची पुनर्निर्मिती करणे आवश्यक आहे. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की खजुराहोतील मंदिरे ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या अखत्यारीत आहेत. "ही एक पुरातत्त्वीय धरोहर आहे. अशा पद्धतीने मूर्ती बदलणे किंवा नवी बसवणे हे एएसआयच्या नियमांनुसार मान्य होईल का, हा स्वतंत्र विषय आहे," असे खंडपीठाने नमूद केले.
पुढे न्या. गवई म्हणाले, "दरम्यान, जर तुम्हाला शैव परंपरेविरुद्ध काही हरकत नसेल, तर तेथे भगवान शंकराचे एक विशाल शिवलिंग आहे. त्याची पूजा करा." शेवटी खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.
0 Comments