बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरी; ३१६ जणांवर कारवाई
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यातील काही शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात राज्य सरकारने कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून आतापर्यंत ३१६ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग, लाभांची वसुली आणि निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.
राज्यातील २८ जिल्हा परिषदांमधील एकूण १०,९२२ दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी ६,२१८ जणांची तपासणी पूर्ण झाली असून त्यात ३१६ जणांकडे वैध दिव्यांग प्रमाणपत्र नसणे, बनावट प्रमाणपत्र सादर करणे किंवा ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असणे असे प्रकार आढळून आले आहेत. याबाबत माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधानसभेत लेखी प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देताना मंत्री सावे यांनी सांगितले की, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, मिळालेल्या लाभांची वसुली आणि निलंबन अशी कठोर पावले उचलण्यात येत आहेत.
दरम्यान, अजूनही हजारो कर्मचाऱ्यांची पडताळणी बाकी असून दिव्यांग योजनांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांना व्यापक तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात निर्देश दिले आहेत.
या कारवाईमुळे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून पुढील काळात या प्रकरणात आणखी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment