Hot Posts

6/recent/ticker-posts

मिनी मंत्रालयासाठी रणधुमाळी! पंचायत समित्यांच्या सभापतींचे आज आरक्षण

 मिनी मंत्रालयासाठी रणधुमाळी! पंचायत समित्यांच्या सभापतींचे आज आरक्षण


सोमवारी गट-गणांच्या आरक्षणावर होणार शिक्कामोर्तब

सोलापूर (सचिन जाधव):- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. यंदा या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून, पहिला टप्पा दिवाळीनंतर म्हणजेच २७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पार पडण्याची शक्यता आहे. या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा समावेश असणार आहे. त्यामुळे 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थांच्या निवडणुकीसाठी सत्तास्पर्धेला सुरुवात होणार आहे.

राज्यात सध्या २३ जिल्हा परिषद, ३३१ पंचायत समित्या, २९ महापालिका आणि २८९ नगरपालिका-नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया रखडलेली होती. या संस्थांचा कार्यकाळ तब्बल तीन वर्षांपूर्वी संपुष्टात आला होता. मात्र, विविध न्यायप्रकरणे आणि इतर तांत्रिक कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने प्रशासनाने तयारीला गती दिली आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात महापालिका किंवा नगरपालिका निवडणुकीऐवजी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन आहे. यासाठी लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा होणार असून, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

या बैठकीत निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम यंत्रांची उपलब्धता, स्थानिक सुरक्षेची स्थिती यांचा अभ्यास केला जाईल. विशेष म्हणजे, या निवडणुकीसाठी शिक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांचीही मदत घेण्यात येणार आहे.

 पंचायत समित्यांच्या सभापतींसाठी आज आरक्षण

राज्यातील ३३१ पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण आज (शुक्रवारी, १० ऑक्टोबर) जाहीर होणार आहे. यानंतर सोमवारी (१३ ऑक्टोबर) जिल्हा परिषदेच्या गटांचे आणि पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी मतदार यादी प्रकाशित केली जाईल. आठ-दहा दिवसांत तिची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी दिली.

निवडणुकांसाठी कर्मचारी तैनात

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध सरकारी विभागांतील कर्मचाऱ्यांची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण आधीच जाहीर झाले असून, आता सभापती, गट व गणांचे आरक्षण निश्चित होताच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक निश्‍चित होईल.

निवडणुका होणाऱ्या संस्था – एक नजर

| संस्था                | संख्या |
| --------------------- | ------ |
| जिल्हा परिषद          | २३     |
| पंचायत समित्या        | ३३१    |
| महापालिका             | २९     |
| नगरपालिका / नगरपरिषदा | २८९    |

राज्यातील राजकीय वातावरण आता पुन्हा एकदा तापणार असून, ग्रामस्तरावरील सत्तासंस्थांमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments