महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल, तब्बल सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. नव्या महायुती सरकारने याआधीदेखील प्रशासकीय पातळीवर फेरबदल केले होते. त्यानंतर आता पुन्हा नवे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील बड्या IAS स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन जिल्हाधिकाऱ्यांच्या समावेश आहे. जळगाव, नाशिक, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच 4 बड्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रशासकीय पातळीवरचे हे महत्त्वाचे बदल आहेत. राज्य सरकारकडून याबाबत बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे. बदली करण्यात आलेले सर्व ज्येष्ठ अधिकारी हे ख्यातनामदेखील आहेत.
7 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
1) नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली करण्यात आली आहे. जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
2) जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
3) ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची देखील बदली करण्यात आली आहे. रोहन घुगे यांची जळगावच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
4) रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. एम देवेंदर सिंह यांची मुंबईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
5) पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची देखील बदली करण्यात आली आहे. शेखर सिंह हे आता नाशिकमध्ये कुंभमेळा आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. त्यांची कुंभमेळा प्राधिकरण आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
6) मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची पुण्यातील रिक्त असलेल्या साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
7) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
0 Comments