सरन्यायाधीशांवर हल्ला; दोषींवर कठोर कारवाई करा
– जिल्हा काँग्रेसची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा गौरव असलेले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न हा भारतीय संविधान, लोकशाही आणि न्याय व्यवस्थेच्या मूलभूत मूल्यावर थेट आघात आहे. सर्वोच्च न्यायालय देशाच्या न्याय व्यवस्थेचे सर्वोच्च मंदिर असून त्या पवित्र दालनात न्यायमूर्तीवर हल्ला करण्याचा हा प्रकार देशाच्या न्यायिक इतिहासातील काळा दिवस आहे. अशा प्रकारच्या घटना नेहमी न्यायिक क्षेत्रात वारंवार घडत असून यातील दोषींवर कारवाई झाली नाही तर समाजामध्ये याबाबतीत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशा विचारसरणीच्या दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, असे जिल्हा काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, संघटक रमेश हसापुरे, सिद्राम पवार, सरचिटणीस प्रा. सिद्राम सलवदे, सुदर्शन आवताडे, आनंद मोरे, अमिर शेख, दत्तात्रेय पवार, मल्लेशी सूर्यवंशी, गेनसिध्द मोटे, मौलाली शेख, परमेश्वर पौळ, देवेंद्र सैनसाखळे, शिववाळ मौली, उत्तमकुमार वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments