शिवरत्न क्रिकेट अकॅडमीच्या वृषाली पवारची क्रिकेट पंच म्हणून निवड
अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे नुकतीच घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत शिवरत्न क्रिकेट अकॅडमी, अकलूजची होतकरू खेळाडू वृषाली तुकाराम पवार हिने उल्लेखनीय यश संपादन केले असून ती सोलापूर जिल्ह्यातील एकमेव उत्तीर्ण उमेदवार ठरली आहे. विशेष म्हणजे वृषाली पवार आता सोलापूर जिल्ह्याची पहिली महिला क्रिकेट पंच म्हणून कामकाज पाहणार आहे.
तिच्या या यशाची दखल घेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वृषालीचा सत्कार करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक अनिल जाधव, शिवरत्न क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक मंजित नवले व प्रशिक्षक बाळासाहेब रणवरे हे उपस्थित होते.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या या पंच परीक्षेत राज्यभरातील अनेक उमेदवारांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये वृषाली पवार हिने आपल्या सातत्यपूर्ण मेहनती, शिस्तबद्ध सराव व क्रीडा समर्पणाच्या जोरावर यश संपादन केले.
वृषाली पवारच्या या कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्यातील महिला क्रिकेटपटू आणि क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
0 Comments