Hot Posts

6/recent/ticker-posts

अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांमुळे तरुणांना प्रगतीची सुवर्णसंधी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांमुळे तरुणांना प्रगतीची सुवर्णसंधी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी



मुंबई (कटूसत्य वृत्त):- भारताला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाचे कौतुक केले असून, आजपासून आयटीआयमध्ये सुरु झालेल्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांमुळे तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री मोदीजी यांनी केले आहे. देश वेगाने प्रगती साधत असून, युवकांसाठी हा संधीचा सुवर्णकाळ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात मोदीजी यांच्या हस्ते अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचाही ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील युवकांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयात अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचाही शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यपाल  आचार्य देवव्रत, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री  किंजरापू नायडू,  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  अजित पवार ,उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री  मंगलप्रभात लोढा व इतर मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी मोदीजी म्हणाले की, "या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमात काळाला अनुरूप अत्याधुनिक रोबोटिक, ग्रीन हायड्रोजन अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोशल मीडिया प्रभावक (इन्फ्लुएंसर) इत्यादी अत्याधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हे अभ्यासक्रम प्रशिक्षणार्थींना नव्या प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी नमूद केले की, देशातल्या आयटीआयला अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाच्या रोजगाराभिमुख संस्था बनवण्यासाठी केंद्र सरकारने ६० हजार कोटींची नुकतीच पीएम सेतू योजना सुरु केली आहे, त्याचाही देशातल्या युवकांना लाभ होणार आहे."

प्रगतीची दूरदृष्टी असलेले राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी आयटीआयमधील अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे महत्व विशद केले. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वात नव्या भारताची निर्मिती होत आहे. या काळात अत्याधुनिक अभ्यासक्रमांच्या माध्यमाने आम्ही कौशल्ययुक्त महाराष्ट्र घडवू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान, अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांच्या नोंदणीचे ७५ हजार उद्दिष्ट असताना शुभारंभालाच राज्यातील सुमारे एक लाख तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करून, उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पुढील वर्षात ही संख्या ५ लाखाच्यावर नेणार असल्याचे राज्याच्या कौशल्य विकास विभागाने सांगितले आहे.

एकीकडे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या शुभहस्ते नवी मुंबईत ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या महत्वकांक्षी उपक्रमाचे उदघाटन होत असतानाच राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तांत्रिक विद्यालये मिळून ५६० संस्थांमध्ये एकाच वेळी विश्वकर्मांच्या प्रमुख उपस्थितीत या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. सुदृढ आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी कामगारांना सन्मानाचे स्थान मिळायला हवे हा प्रधानमंत्री मोदीजींचा विचार आम्ही या निमित्ताने पुढे घेऊन जात असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी नमूद केले.



Reactions

Post a Comment

0 Comments