माढ्यातील पूरग्रस्तांसाठी गणपती फार्मसीचा मदतीचा हात”
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावं जलमय झाली आहेत. लव्हे (ता. माढा) गावातील घराघरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शेतजमिनी वाहून गेल्या; गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हतबलता दिसत होती. मात्र अशा कठीण घडीला गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णीचे विद्यार्थी व प्राध्यापक खऱ्या अर्थाने आशेचा आधार ठरले.
एनएसएस विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गावात पोहोचताच पूरग्रस्तांच्या डोळ्यात दिलाशाचे पाणी दाटले. चिखलाच्या रस्त्यांवरून चालत विद्यार्थ्यांनी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांची विचारपूस केली. जीवनावश्यक अन्नधान्य साहित्य, औषधे व इतर मदतवस्तूंचे वाटप करताना मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य खुलले आणि वृद्धांच्या संवेदनशील डोळ्यांत कृतज्ञतेची चमक दिसू लागली.
प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले, “शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातले धडे नसतात, तर खऱ्या संकटात समाजासाठी उभे राहणे हाच ज्ञानाचा खरा परीक्षेचा दिवस असतो.” त्यांच्या या शब्दांनी विद्यार्थ्यांच्या सेवाभावाला नवे बळ मिळाले.या उपक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. रवींद्र बेंदगुडे, अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. कोमल साळुंखे, प्रा. सुप्रिया म्हमाणे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
गणपती फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी केलेली ही समाजसेवेची कृती पूरग्रस्तांसाठी दिलासा ठरलीच, पण तीच कृती समाजातील इतर तरुणांसाठी प्रेरणेचा नवा किरण ठरली आहे.
0 Comments