सुरेश पाटोळे यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या वतीने सोलापूर येथील मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते आणि क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सुरेश पाटोळे यांनी अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड आरक्षण वर्गीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आला.
सुरेश पाटोळे हे मागील २५ वर्षांपासून मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नतीसाठी निस्वार्थपणे कार्यरत आहेत. त्यांनी लष्कर येथे ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय’ स्थापन केले आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात.
सोलापूर शहरात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठीही सुरेश पाटोळे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच ते दरवर्षी मोफत आरोग्य शिबिर, नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करतात. सामुदायिक विवाह आयोजन व इतर सामाजिक उपक्रम राबवित असतात,मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध त्यांनी निवेदने, मोर्चे आणि आंदोलने यांच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख ₹२१००/- असे होते. हा पुरस्कार नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश दादा नाईक यांच्या उपस्थितीत व थोर विचारवंत शरदकुमार ढोले साहेब यांच्या हस्ते,संस्थेचे अध्यक्ष दिलीपकुमार राजेंद्र गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ 8/10/2025 बुधवारी विष्णुदास भावे सभागृह, वाशी, नवी मुंबई येथे संपन्न झाला.
0 Comments