Hot Posts

6/recent/ticker-posts

रक्षकच भक्षक झाले तर जनतेचा न्याय कुणाकडे ? — संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेडचा संतप्त सवाल

 रक्षकच भक्षक झाले तर जनतेचा न्याय कुणाकडे? — संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेडचा संतप्त सवाल

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर प्रकरणी 

आरोपींना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

सातारा (कटूसत्य वृत्त):- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवरील बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांना तात्काळ अटक करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी संभाजी ब्रिगेडने जोरदार मागणी केली आहे.

या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का? रक्षकच भक्षक झालेत का? असा प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे. ज्यांच्याकडून संरक्षणाची अपेक्षा असते, तेच जर अत्याचार करत असतील, तर ही परिस्थिती भयावह आहे.”

महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या दोघा पोलिस अधिकाऱ्यांची नावे स्पष्टपणे नमूद केली आहेत, अशी माहिती समोर आली आहे. “चार वेळा बलात्कारासारखा अमानुष प्रकार करून पोलिसांनी स्वतःच्या वर्दीवर आणि संपूर्ण विभागावर काळी छाया आणली आहे,” असे शिंदे म्हणाले.

संभाजी ब्रिगेडने स्पष्टपणे सांगितले की, “या प्रकरणात आरोपींना फक्त निलंबित करून चालणार नाही, तर त्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ करावे. कोणताही खासदार, मंत्री किंवा त्यांचा पी.ए. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यावरही कारवाई व्हायला हवी. कायदा सर्वांसाठी सारखा असावा आणि या प्रकरणात कठोर शिक्षा झाली पाहिजे.”

या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून, सरकारने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments