Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी बार्शी बाजार समितीचा मोठा पुढाकार

 मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी बार्शी बाजार समितीचा मोठा पुढाकार

 



बार्शी (कटूसत्य वृत्त):-
अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुपये १ कोटींचा धनादेश सुपूर्त करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे हा धनादेश सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी सुपूर्द केला. या निधीचा उपयोग अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी करण्यात येणार आहे.
राज्यभरातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतजमिनींचे, पिकांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या वतीने मदतकार्य सुरू असतानाच, स्थानिक पातळीवरून मिळणाऱ्या या योगदानामुळे शासनाच्या मदतीला अधिक बळ मिळणार आहे.
दरम्यान, बार्शी तालुक्यातील समाजातील विविध घटकांनीही या कार्यात सहभाग घेतला आहे. समाजसेवी संस्था, डॉक्टर, उद्योजक, व्यापारी तसेच विविध संघटना यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वयंस्फूर्तीने देणग्या दिल्या आहेत.

आजपर्यंत बार्शी तालुक्यातून एकूण रुपये १,२९,०३,२११ इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा करण्यात आली आहे, ही बार्शीच्या लोकांच्या संवेदनशीलतेची आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेची प्रचीती देणारी बाब ठरली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात एकजुटीने उभे राहण्याचे आणि मदतकार्य सातत्याने सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments