श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळकडून ५ हजार किट्स आणि १ हजार साड्यांचे वाटप!
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे रु. ५० लाखाचे ५ हजार नग आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांचेवतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून धान्य शिधा किटचे आणि १००० पूरग्रस्त महिलांना साडी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी गुरुवार (विजयादशमी, दसरा) च्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या बरोबरच अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीची लवकरच निर्मिती करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
या पत्रकार परिषदेस सचिव शामराव मोरे, मनोज निकम, अरविंद शिंदे हे उपस्थित होते.
न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हणाले, सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोलापूर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आहावानानुसार बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे रु. ५० लाखाचे ५ हजार नग अन्नछत्र मंडळ यांचे कडून व न्यासाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या, संस्थापक अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले, यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त महिलांसाठी १ हजार साडी चोळीचे पूरग्रस्ताना वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सुपूर्त करण्यात येणार आहे.
न्यासाचे सचिव शामराव मोरे म्हणाले, जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे धर्मादाय न्यास गेली ३८ वर्षे स्वामींचे अन्नदानाचे कार्य सातत्याने करीत सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रिडा व पर्यावरण पुरक असे नानाविध उपक्रम सदैव राबवित असते, तसेच पूरग्रस्त, जळीतग्रस्त, भूकंपग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देत असते. शासनाच्या विविध उपक्रम राबविण्यात व शासनास सहकार्य करण्यात हे धर्मादाय न्यास सदैव अग्रेसर असते असे सांगून, ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक तालुके बाधित झाले असून, ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केल्याप्रमाणे त्यास प्रतिसाद देण्यात आल्याचे शामराव मोरे यांनी सांगून पुढे बोलताना म्हणाले, अन्नछत्र मंडळ व त्यांची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी या संस्थेकडून देखील सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक व पर्यावरणविषयक उपक्रम राबवित समाजात जनजागृती करीत असते, सखी भगिनींना समाज प्रबोधन करीत असते असे यावेळी शामराव मोरे यांनी सांगितले.
चौकट :-
अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीची निर्मिती लवकरच..!
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली हे धर्मदाय न्यास नेत्रदिपक प्रगतीची वाटचाल करीत आहे.
अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले हे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू व क्रिकेटप्रेमी होते. त्यांच्या सन्मानार्थ अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीची निर्मिती करण्यात येणार आहे.या कामास अंदाजे ५० लाख इतका खर्च अपेक्षित असून, सदर ट्रेनिंग अकॅडमी ही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नवीन वाहनतळ जागेत उभारण्यात येत आहे. याकामी सोलापूरचे प्रसिद्ध क्रिकेटपटू व प्रशिक्षक सत्यजित जाधव यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे. हे प्रशिक्षण केंद्र अल्पावधीतच सुरू होत असल्याचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी सांगितले आहे.
चौकट: -
सगळ्यात मोठी घोषणा:-
सोलापूर जिल्ह्यातच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धार्मिक न्यासाने सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्याकरिता सगळ्यात मोठी घोषणा करणारी संस्था ठरली आहे.
0 Comments