Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद निवडणुकीत पेनुर जिल्हा परिषद गटात होणार पंचरंगी घमासान

 जिल्हा परिषद निवडणुकीत पेनुर जिल्हा परिषद गटात होणार पंचरंगी घमासान




एकाच पेनुर मधील दोन चवरे येणार आमने

मात्र  "त्या दोन चवरेंची" पडद्यामागील भूमिका मात्र गुलदस्त्यात

मोहोळ (साहिल शेख):- मोहोळ तालुक्यात राजकीय दृष्ट्या सातत्याने चर्चेत असलेल्या पेनुर जिल्हा परिषद गटात आरक्षण सोडतीनंतर जोरदार राजकीय विह रचनेला प्रारंभ झाला आहे. पेनुर मधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या विरोधात अनगरकर -पाटील परिवाराचे खंदे समर्थक रामदास चवरे हे उभे ठाकणार आहेत. तर गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपासून माजी आमदार राजन पाटील यांच्यापासून चार हात दूर असलेले माजी उपसभापती मानाजी माने या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार ? हे सध्या गुलदस्त्यात आहे. जेष्ठ नेते मानाजी माने जरी सध्या तटस्थ असले तरी त्यांचे सुपुत्र विक्रांत माने आणि अनगरकर - पाटील परिवारातील बाळाराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांच्यामधील जवळीक पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी वाढली आहे. त्यामुळे माने परिवाराची येत्या काळातील राजकीय भूमिका नक्की कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. यामध्ये पेनुर मधील दोन चौरे जरी एकमेकांविरोधात टाकणार असले तरी या दोघांच्या मागील "ते दोन चवरे " नेमके कोणाचे काम करणार याबाबत उत्सुकता कायम आहे.


गाव पातळीवरील एक सामान्य कार्यकर्ता ते शिवसेना शिंदे गटासारख्या मोठ्या पक्षाचा जिल्हाप्रमुख अशी अल्पावधीतच राजकीय गरुड भरारी घेणारे चरणराज चवरे यांचे यश केवळ राष्ट्रवादीलाच नाही तर महायुती मधील अन्य  मित्रपक्षांना देखील चांगलेच खटकत आहेत. मात्र विरोधकांच्या टीकाटिपणीला प्रतिउत्तर न देता त्यांनी पेनुर ते मुंबई अशा मॅरेथॉन वाऱ्या करत डीपीडीसीचे मिळवलेले सदस्यपद आणि त्या माध्यमातून पेनुरचा सुपुत्र म्हणुन  जि. प. मध्ये गाजवलेला प्रचंड आवाज या बाबी प्रचंड चर्चेत आल्या. जिल्हा नियोजन म्हणजे डी. पी. डी. सी. च्या त्या माध्यमातून निधी खेचून आणत केलेली रस्त्यांची विकास कामे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. जरी चरणराज चवरे विकासाबाबत अग्रेसर असले तरी त्यांच्यासोबत रणनीती आखणारी मंडळी तितकीशी राजकीय दृष्ट्या अनुभवी नाही. मात्र चरणराज चवरे यांच्या राजकीय जीवनातील गुरु उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री ना भरतशेठ गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे, परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांचे मार्गदर्शनाचे मोठे पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. मात्र या जि. प. गटा.तील अनेक गावात राष्ट्रवादी अनगरकर - पाटील परिवारालाही मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र भीमा परिवाराच्या पट्ट्यात हा जिप गट येत असल्यामुळे त्यामुळे चरणराज चवरे यांना या जि.प. गटातून विजय मिळवणे तसे सोपे नसले तरी अशक्य मात्र नाही.

रामदास चवरे हे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष नामदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली आणि लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील आणि सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले पेनुर मधील युवा नेते आहेत. अत्यंत मृदू स्वभाव, संयमी कार्यशैलीच्या रामदास चवरे यांनी देखील प्रतिस्पर्धी असलेल्या चरणराज चवरे यांच्यावर कधीही टीका टिपणी न करता अत्यंत अजातशत्रु वृत्तीने आणि प्रांजळ भावनेने राजकारण करण्यावर भर दिला आहे. आरक्षण प्रक्रिया होण्याच्या अगोदरपासूनच रामदास चवरे जि.प.ची निवडणूक लढवणार असा विश्वास त्यांच्या समर्थकांना होता. रामदास चवरे यांच्या प्रचाराची मोठी भिस्त त्यांचे नेते बाळराजे पाटील यांच्यावर अवलंबून आहे. बाळराजे पाटील यांनी या प्रभागातील अनेक गावांना आमदार यशवंत माने यांच्या कालावधीत विविध माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी तर दिलाच. मात्र या भागातील अनेक महत्त्वांच्या रस्त्यांना शेकडो कोटींचा निधी दिल्यामुळे या भागातील दळणवळणाचा प्रश्न राष्ट्रवादीनेच सोडवल्यामुळे लोकांच्या मनात राष्ट्रवादी बद्दल सकारात्मक भावना आहे. साहजिकच बाळराजे पाटील यांचा देखील या जि.प. गटातील अनेक गावात मोठा जनसंपर्क असल्यामुळे बाळराजे त्यांच्या पाठीशी प्रचार यंत्रणेची फौज कशी सक्रिय ठेवणार याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे.

चौकट
जनहित शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आणि पाटकुलचे सुपुत्र प्रभाकरभैय्या देशमुख हे देखील याच प्रभागातील अभ्यासू आणि लोकप्रिय नेतृत्व आहेत. ते निवडणूक लढवणार की अन्य कोणती भूमिका घेणार याबाबत देखील मोठे उत्सुकता आहे. याशिवाय कोथाळेचे सुपुत्र आणि काँग्रेस पक्षाचे नेते राजेश पवार हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी कडून ज्येष्ठ नेते मानाजीबापू माने मैदानात उतरले तर ही निवडणूक अप्रत्यक्षरीत्या पंचरंगी होण्याचे दाट संकेत आहेत.



Reactions

Post a Comment

0 Comments