तुटपुंज्या मदतीच्या घोषणेनं शेतकऱ्यांची थट्टा !
सरकारवर विरोधकांचा कडाडून हल्ला
मुंबई (कटूसत्य वृत्त):- अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने मोठ्या गाजावाजात 31,628 कोटींच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा केली असली, तरी या मदतीवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी ही मदत तुटपुंजी आणि दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे.
वडेट्टीवार : “ही शेतकऱ्यांची थट्टा”
या घोषणेनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्ला चढवला. “महायुती सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे,” असा आरोप करत त्यांनी आकडेवारी दिली की, मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर गेल्या 15 दिवसांतच 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
“शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लागणाऱ्या मदतीऐवजी केवळ आकड्यांचा खेळ करून दिशाभूल केली जात आहे. हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी होती, पण NDRF निकषांनुसार केवळ तुटपुंजी मदत दिली जात आहे,” अशी टीका त्यांनी केली.
“कर्जमाफीचं फक्त आश्वासन, प्रत्यक्षात शून्य”
वडेट्टीवार पुढे म्हणाले, “महायुतीने निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र आजपर्यंत केवळ तारखा जाहीर होत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार हे सरकार सांगत नाही.”
रोहित पवार : “मीठ चोळण्याचं काम”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीदेखील सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून प्रतिक्रिया देत म्हटलं, “हे सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळत आहे. संपूर्ण कर्जमाफीपासून ते हेक्टरी किमान ५० हजार रुपयांपर्यंत मदतीची गरज असताना, केवळ NDRF निकषांनुसार तुटपुंजी मदतीची घोषणा करण्यात आली.”
त्यांनी याचे उदाहरण देत स्पष्ट केलं की, बागायती शेतीसाठी ७० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च होत असतानाही सरकार केवळ हेक्टरी ३१,५०० रुपये देणार आहे. हंगामी बागायतीसाठी २७,५०० आणि जिरायतीसाठी १८,५०० रुपये दिले जाणार आहेत.
“हा खर्च भरून काढण्याऐवजी शेतकरी अधिक कर्जबाजारी होईल,” असे रोहित पवार यांनी नमूद केले.
‘पॅकेजची घोषणा दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात येईल का?’
विरोधकांचा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती पोहोचणार की नाही. “सरकारने घोषणांचा पाऊस पाडलाय, पण शेतकऱ्यांच्या हाती अजून एक थेंबही पोहचलेला नाही,” अशी टोलेबाजी विरोधकांनी केली.
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ३१ हजार कोटींची मदत ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी आहे की नाही, यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांच्या आरोपांवर सरकार काय उत्तर देणार आणि ही मदत प्रत्यक्षात कधी मिळणार, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
.jpg)
0 Comments