Hot Posts

6/recent/ticker-posts

नेते म्हणतात आमच्या शिवाय पर्याय नाही कार्यकर्ते म्हणतात "आम्ही लढायचं कधी " ?

 नेते म्हणतात आमच्या शिवाय पर्याय नाही कार्यकर्ते म्हणतात "आम्ही लढायचं कधी " ?




मोहोळ नगरपरिषद रणधुमाळी
भाग दोन


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- कार्यकर्त्याला दररोज वाटते आपला नेता मोठा व्हावा. नेत्याला वाटते आपला पक्ष मोठा व्हावा. पक्षाला वाटते आपली सत्ता यावी. मात्र या सर्व बाबीची उतरंड ज्या सर्वात छोट्या घटकावर आहे त्या कार्यकर्त्याला देखील मोठे करण्याची मानसिकता नेते मंडळींची हवी. आरक्षण सोडतीनंतर अनेक प्रभागातून इच्छुकांनी आपल्या फोटोला प्रभागाचे नाव देत आपण स्वतः निवडणुकीत इच्छुक असल्याचे जाहीर करून टाकले साहजिकच त्यांच्या समर्थकांनी देखील स्टेटस ठेवणे साहजिक आहे. मात्र शहरात असे काही नेते आहेत त्यांना त्यांचे स्वतःचेच फोटोचे स्टेटस स्वतःच्याच अकाउंटला ठेवावे लागले. यावरून त्यांच्यासोबतचा असलेला जनाधार कमी झाल्याचे देखील जाणवत आहे. वर्षानुवर्ष खांबावर चढून झेंडा बांधणारा, व्यासपीठावर जाऊन सभेचा फलक बांधणारा, नेत्यांच्या गाडीवर मागे बसून बेंबीच्या देठापासून घोषणा देणारा कार्यकर्ता देखील नगरसेवक व्हावा असे जोपर्यंत सत्तेचा लाभ गेले अनेक वर्षे घेणाऱ्या नेते मंडळींना वाटत नाही, तोपर्यंत ही निवडणूक आणि लोकशाहीची खरी व्याख्या सार्थ ठरवणे अशक्य ठरणार आहे हे मात्र नक्की.
 
 ज्यावेळेस एखादे लग्नकार्य असते त्यावेळेस व्यासपीठावर जाऊन रुबाबात सत्कार घेणारा पदाधिकारी व्हीआयपी ठरवला जातो, मात्र लग्नातील जेवणाच्या पंगतीमधील पत्रवाळ्या उचलताना अंगावर भाजी सांडलेला कार्यकर्ता कोणाच्याच नजरेत भरत नाही. अगदी अशाच प्रकारे राजकारणात मनापासून पक्ष कार्य करणारा मतदाराशी दररोज संपर्क ठेवणारा, आठवडा बाजारातील भाजी घेण्यासाठी तीनशे रुपये फोन पे कार्यकर्त्याला करणारा सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा मात्र पदावर नसलेला एखादा छोटासा उपनेता कायम उपेक्षित जीणं जगतोय. जेव्हा निवडणुकीसाठी तो उभे राहण्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्याचा आर्थिक स्तर तपासण्याची आपली विचारसरणी लोकशाहीला भांडवलदाराच्या दारात हतबल उभ्या असलेल्या याचका सारखी जणू भासत आहे. तो इच्छुक असला म्हणून काय झालं त्याच्याकडे कुठे निवडणूक लढवायला पैसे आहेत असे म्हणत जेव्हा नेतेमंडळी स्वतःच्याच पदरात उमेदवाऱ्या पाडून घेतात निवडणूक लढवतात आणि पुन्हा मोठे भांडवलदार बनतात तेव्हा कार्यकर्त्याला त्यांच्या निवडणुकीचा गुलाल अंगावर टाकून गावभर फिरण्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण बऱ्याचदा आपण जन्मावं कोणाच्या घरात ? हे आपल्या हातात नसतं. मात्र आपण वावरावे कोणत्या चांगल्या कार्यकर्त्यात, आणि सोबत राहावं कोणत्या मतदारात हे बऱ्यापैकी त्या उपनेत्यांच्या आणि चांगल्या पदाधिकाऱ्यांच्या हातात असतं. म्हणून काही शहरातील पदाधिकारी आणि उपनेते कोणत्याच सर्वपक्षीय पक्षश्रेष्ठींच्या चुचकारण्याला घाबरत नाहीत..


चौकट
शहरातील अनेक प्रभाग जणू काही इच्छुक आणि विद्यमान नगरसेवकांचे संस्थान बनल्यागत वाटत आहे. आणि ते त्या प्रभागाचे कारभारी बनल्यामुळे ते जणू संस्थानिक आणि त्यांच्यासोबत वावरणारे कार्यकर्ते आणि मतदार जणू प्रजाच. प्रभागात एखाद्या मोठ्या कामाला कोट्यावधी रुपयांचा निधी मागण्यासाठी आपल्या आलिशान गाडीत चार दोन कार्यकर्ते आणि एखाद्या ट्रॅक्समध्ये प्रभागातील इतर कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बिल काढण्यासाठी मात्र एकटेच एसटीने जाणे पसंत केले.

चौकट
डीपीडीसीच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यानी राजकारणाचा परमार्थ करता करता स्वतःचा स्वार्थ किती करावा याची लिमिट कोणालाच उरले नाही. आज शहरात काही पदाधिकारी असे आहेत जे अधिकाऱ्यांना घरी बोलावून एम बी वर सह्या करायला सांगू शकतात. इतके सामर्थ्य इतका उन्माद कुठून आला ?तर तो तुमच्या आमच्या मतदानामधून. क्षणिक वेळेसाठी प्रलोभनाला बळी पडून आपण जे मतदान करतो त्यामधून आपण आपल्याच प्रभागात एक कुणीही रोखू न शकणारा उन्मादक घटक तयार करतोय हे लक्षात यायला जवळपास नऊ वर्षाचा कालावधी जावा लागला.
Reactions

Post a Comment

0 Comments