जमिनीची नोंद लावायला ४० हजारांची लाच घेणारा करकंबचा मंडलाधिकारी रंगेहाथ पकडला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तलाठ्यांनी लावलेली जमिनीची नोंद मंडलाधिकाऱ्यांनी फेटाळली. ऑनलाइन नोंद लावण्यासाठी करकंबचा मंडलाधिकारी राजेंद्र भगवान वाघमारे (वय ५३, रा. भाळवणी, ता. पंढरपूर) याने लाच मागितली.
४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे येथील पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदाराने जमीन घेतली होती. तलाठ्याने नियमानुसार जमिनीची नोंद लावली होती. पुढील मंजुरीसाठी तलाठ्यांनी ती नोंद मंडलाधिकाऱ्यांकडे पाठवली होती. ती नोंद फेटाळल्याचे मंडलाधिकारी वाघमारे याने सांगितले, पण नोंद धरण्यासाठी त्याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तक्रारदाराने ४० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, रितसर नोंदीसाठी मंडलाधिकारी लाच मागत असल्याची तक्रार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा केली आणि पुण्याच्या पथकाने सापळा रचला. गुरूवारी (ता. ९) दुपारी साडेचारच्या सुमारास मंडलाधिकाऱ्याने लाचेची रक्कम स्विकारण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयामागील रायगड भवनमागे बोलावले होते. त्याठिकाणी रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर, सुहास हट्टेकर व रविंद्र लांभाते यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली. अधिकाऱ्यांनी मंडलाधिकाऱ्याच्या घराचीही झडती घेतली. दरम्यान, मंडलाधिकारी वाघमारे याच्याविरूद्ध पंढरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे.
पैसे टाकून पळत होता, पण..
तक्रारदाराकडून लाच घेताना मंडलाधिकारी वाघमारे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आला. त्यावेळी तो रक्कम तेथेच टाकून पळून जात होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पळत जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला उद्या (शुक्रवारी) पंढरपूर न्यायालयात हजर केले जाणार आहे.
0 Comments