PUC नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारचा मोठा निर्णय
मुंबई (कटूसत्य वृत्त):- भविष्यातील पिढ्यांसाठी प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने परिवहन विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व पेट्रोल पंपांवर 'नो पीयूसी... नो फ्युएल' (No PUC... No Fuel) उपक्रम कठोरपणे लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
या उपक्रमाअंतर्गत, वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसलेल्या कोणत्याही वाहनाला इंधन दिले जाणार नाही.
मंत्री सरनाईक म्हणाले, राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला (स्कॅन करून ) जाईल. जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल. जर त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही. तथापि, त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल. जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ला युनिक आयडेंटी (UID) असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते.
भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम व वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल. जेणेकरून रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेले असेल. ज्यामुळे प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत होईल. त्याबरोबरच सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पडदाफाश करण्यासाठी मोठा परिवहन विभागाने धडक मोहीम राबवावी, असा सूचनाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिल्या.
यासह बैठकीत परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणे, परिवहन भवन बांधकाम आदी बाबींचा आढावाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी घेतला.
कशी होणार अंमलबजावणी?
सीसीटीव्ही स्कॅनिंग: प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांचा क्रमांक स्कॅन केला जाईल.
पीयूसी तपासणी: स्कॅन केलेल्या क्रमांकावरून त्या वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र वैध आहे की नाही, हे तपासले जाईल.
इंधन नाही: पीयूसी प्रमाणपत्र वैध नसेल, तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही.
जागेवरच पीयूसीची सोय: वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी, त्याच पेट्रोल पंपावर तात्काळ पीयूसी प्रमाणपत्र काढून देण्याची व्यवस्था केली जाईल.
युनिक आयडी: प्रत्येक पीयूसी प्रमाणपत्राला एक युनिक आयडेंटिटी (UID) दिली जाईल, ज्यामुळे त्याची वैधता वेळोवेळी तपासता येईल.
अवैध प्रमाणपत्रांवर कारवाई
या बैठकीत सरनाईक यांनी अवैध मार्गाने पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेशही दिले. भविष्यात वाहन विक्री करणारे शोरूम्स आणि गॅरेजेसमध्येही पीयूसी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली जाईल, जेणेकरून रस्त्यावरील प्रत्येक वाहनाकडे वैध प्रमाणपत्र असेल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
0 Comments