सांगोल्यात 'शक्तिपीठ'चे मोजणीदार पाठविले माघारी
मेथवडे(कटूसत्य वृत्त):- मेथवडे व संगेवाडी (ता. सांगोला) यासह आठ गावातील ग्रामस्थांनी गुरुवारी (ता. ४) शक्तिपीठ मार्गाच्या मोजणीला विरोध दर्शवून अधिकाऱ्यांना माघारी पाठवले. त्यामुळे तालुक्यात या मार्गाविरोधात वातावरण तापू लागले आहे.
तालुक्यातील २१ गावांतून जाणाऱ्या शक्तिपीठ मार्गावरील फक्त चार गावांची मोजणी पूर्ण झाली आहे.
शक्तिपीठ मार्ग तालुक्यातील २१ गावातून जाणार आहे. या मार्गावर ६०० हेक्टर क्षेत्रावरील ६१३ गट बाधित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी केवळ चार गावात मोजणी पूर्ण झाली आहे, तर मेथवडे, एखतपूर, बलवडी, वझरे, यलमार, मंगेवाडी, पाचेगाव, संगेवाडी व कोंबडवाडी या आठ गावांनी मात्र मोजणीस संपूर्ण विरोध दर्शविला आहे.
तालुक्यातील सांगोला, कमलापूर, बामणी आणि देवकतेवाडी या चार गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. तर बंडगरवाडी (चो), चोपडी, चिंचोली आणि मांजरी येथे मोजणी अंशतः झाली आहे. नाझरे, सोमेवाडी आणि चिणके येथे मोजणी सुरू आहे. मेथवडे, एखतपूर, बलवडी, वझरे, यलमार, मंगेवाडी, पाचेगाव, संगेवाडी व कोंबडवाडी या आठ गावांनी मात्र मोजणीस संपूर्ण विरोध दर्शविला आहे.
गुरुवारी (ता. ४) संगेवाडी व मेथवडे येथे मोजणीसाठी अधिकारी दाखल झाले असता, शेतकऱ्यांनी एकत्र येत त्यांना मोजणी न करू देता परत पाठवले. त्यामुळे शक्तिपीठ मार्गाच्या विरोधातील चळवळ तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

0 Comments