पूरग्रस्तांसह प्रवाशांना मोहोळमध्ये मदतीचा हात
पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील सीना नदी पात्रालगत असलेल्या जवळपास 35 गावात महापुराचे पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांना आपले राहते घर, प्रपंच सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. तर दुसरीकडे जवळपास 15 ते 18 तासांपासून मोहोळ ते लांबोटी दरम्यान प्रवासात असलेले नागरिक अडकले आहेत. या नागरिकांना न खाण्याची न पाण्याची सोय होती.
मोहोळ शहरासह तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येत पूर परिस्थितीत अडकलेल्या व प्रवासात अडकलेल्या नागरिकांना पाण्याची व खाण्याची सोय करून मानवतेचा हात दिला. मोहोळ तालुक्याच्या हद्दीतून वाहणार्या सीना नदी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे पात्रालगतच्या गावांना त्या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला. प्रशासनाने वेळीच त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. त्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना पाण्याची व खाण्याची सोय व्हावी, म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पाण्याच्या बॉटल बिस्कीटचे पुडे, चिवडा पाकीट अशा वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोच केल्या. आपल्याच माणसांवर ओढवलेल्या वाईट परिस्थितीत त्यांना धीर दिला. मोहोळ शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून बुधवारी दिवसभर त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केली.
लांबोटी पुलावरील वाहतूक मंगळवारी रात्री दहा वाजल्यापासून सुरक्षिततेच्या कारणावरून बंद करण्यात आल्यामुळे मोहोळ शहरापर्यंत मालवाहतूक करणार्या ट्रक, ट्रॅव्हल्स व इतर खासगी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये असलेल्या नागरिकांना मोहोळ शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी भात-भाजी करून प्रत्यक्ष वाटप केले. काहींनी पोहे, केळी, बिस्कीटचे पुडे, पाण्याच्या बाटल्या आदी खाण्याचे साहित्य पोहोच केले.
.png)
0 Comments