सपोनि नेताजी बंडगर यांचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार
माढा (कटूसत्य वृत्त):- पोलीस खात्यात उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी बजाविल्याबद्दल माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर व लोंढेवाडीचे कवी बाबासाहेब लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांनी सांगितले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या व सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात जबाबदारीने व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणे ही मोठी तारेवरची कसरत आहे. विशेषत: पोलीस खात्यात सेवा बजाविताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना अडचणीच्या वेळी मोठी जोखीम घ्यावी लागते.सपोनि नेताजी बंडगर हे एक शिस्तप्रिय व धाडसी अधिकारी आहेत.हाताखालील कर्मचाऱ्यांकडून सर्व कामे योग्य पद्धतीने करुन घेण्यासाठी ते विविध कौशल्ये व अनुभवाचा कुशलतेने वापर करतात. सध्याच्या युगात सायबर गुन्हेगारी रोखणे हे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कवी बाबासाहेब लोंढे यांनी सांगितले की,पोलीस खात्यातील काही अधिकारी उत्तम प्रशासनासोबतच सामाजिक बांधिलकीही जपण्याचे मनोमन काम करतात.याच पद्धतीने सपोनि नेताजी बंडगर यांनी प्रभावीपणे काम केले आहे त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असून माढा पोलीस स्टेशनच्या दृष्टीने ऐतिहासिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सपोनि नेताजी बंडगर यांनी सांगितले की,पोलीस खात्यात उत्कृष्ट व प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचा नक्कीच सन्मान होतो.प्रत्येक ठिकाणी काम करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.गुन्हेगारी रोखण्याबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा मानस आहे.माढा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक गावातील शिक्षक,डॉक्टर, पत्रकार,पोलीस पाटील, साहित्यिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जो माझा सत्कार केला आहे त्यामुळे आणखी जोमाने व जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
यावेळी माढा पोलीस स्टेशनमधील अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments