Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात पावसामुळे उरली सुरली पिकेही गेली पाण्याखाली

 सोलापूरात पावसामुळे उरली सुरली पिकेही गेली पाण्याखाली





शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील १३ महसूल मंडलांत गुरुवारी रात्री २ ते सकाळी ७ पर्यंत मुसळधार पाऊस झाला. अवघ्या पाच तासात या पावसाने होत्याचे नव्हते केले. खरिपांच्या पिकांची शेतात असलेली रास मातीमोल झाल्याने या पावसाने शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे.

वागदरी, शेळगी, वळसंग, होटगी, अक्कलकोट, चपळगाव आणि किणी या सात महसूल मंडळात अवघ्या पाच तासांत १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. रात्री बाराच्या सुमारास चालू झालेला पाऊस पहाटे पाच वाजेपर्यंत पडत होता. केगाव येथील डाळिंब संशोधन केंद्राच्या पर्जन्यमापकात या पावसाची ६५ मिलिमीटर इतकी नोंद झाली. या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. काढणीस आलेला उडीद, सोयाबीन लागण केलेल्या कांदा रोपांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

सध्या सुरू असलेल्या पूर्वा नक्षत्रातील पावसाने अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुका आणि सोलापूर शहराला जोरदार झोडपले आहे. रात्रीपासून विजांच्या कडकडाटात सूरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले. खरिपाच्या पिकांचा हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. सोलापूर शहरातील विडी घरकूल, शेळगी, अक्कलकोट रोड, अवंतीनगर, देगाव या भागात पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे.

जिल्ह्यात सकाळी ८ पर्यंत सरासरी २८.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अक्कलकोट तालुक्याची सप्टेंबरच्या पावसाची सरासरी १७३.९ मिलिमीटर एवढी आहे. अक्कलकोट तालुक्यात पाच तासातच सरासरी ९६.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात सरासरी ६८.८ मिलिमीटर तर उत्तर सोलापूर तालुक्यात सरासरी ६४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. पुढील पाच दिवस सोलापूर शहर व परिसरात मध्यम पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या बाणेगाव, भोगाव, मार्डी, कोंडी, हिरज या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कोंडी येथील शेतकऱ्याच्या स्वयंचलित पर्जन्यमापकात या पावसाची ६४ मिलिमीटर तर बाणेगाव येथील पाणी फाउंडेशनचे जलमित्र अमोल पांढरे यांच्या पर्जन्यमापकात या पावसाची नोंद ६६ मिलिमीटर इतकी झाली.

बीबीदारफळ येथे ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे काढणी सुरू असलेला उडीद पाण्याखाली गेला. चार दिवसाच्या उघडीपी मुळे शेतकऱ्यांची उडीद काढण्याची लगबग सुरू होती. मात्र अचानक पडलेल्या या जोरदार पावसामुळे उडीद भिजून गेला. तालुक्यातील कळमन, गावडी दारफळ या परिसरात मात्र अवघा एक मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती समोर येत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments