Hot Posts

6/recent/ticker-posts

बोरी नदीच्या पूराने जनजीवन विस्कळित; नुकसानभरपाई व पर्यायी रस्त्याची मागणी

 बोरी नदीच्या पूराने जनजीवन विस्कळित; नुकसानभरपाई व पर्यायी रस्त्याची मागणी




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :– अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी लगतच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील चिंचोळी (मै.) हे गाव तर बोरी मध्यम प्रकल्प कुरनूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे अक्षरशः अलगद झाले आहे. रुध्देवाडीला जाणारा गावाचा एकमेव मुख्य रस्ता महिनाभरात दहा–पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ बंद राहिला आहे. परत कालपासून हा मार्ग पुन्हा बंद झाल्याने ग्रामस्थांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

या मार्गाच्या बंदोबस्तामुळे दुधनी येथे दवाखाना, बाजारपेठ, रोजगार तसेच मैंदर्गीकडे जाणे अशक्य झाले आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना “कुठे जावे, काय करावे?” असा प्रश्न पडला आहे. बोरी नदीचे पाणी भिमा नदीला मिळत असल्याने शिवारातील पाणी कमी होण्यास तब्बल १२ ते १५ तासांचा विलंब होत आहे. परिणामी गावाचा संपर्क वारंवार तुटत आहे.

कर्नाटकच्या अफझलपूर तालुक्यातील जेवर्गीकडे जाणारा कच्चा रस्ताही बोरी नदीच्या बॅकवॉटरने बंद झाला आहे. यामुळे पेशंटना दवाखान्यात नेणे, बाजारहाट करणे किंवा दैनंदिन गरजा भागवणे यावर मर्यादा आल्या आहेत.

पूरामुळे बोरी नदीकाठावरील शेती पिकांत पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. जमिनी खरडून शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन अधिकच विस्कळीत झाले आहे.

ग्रामस्थांच्या वतीने निवृत्त नायब तहसिलदार (गोवा) बाबुराव फुलारी यांनी दुधनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे व जुना मुगळी रस्ता पुन्हा सुरू करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. तर प्रगतशील शेतकरी विजयकुमार आंदेवाडी यांनी शेतकरी व ग्रामस्थांच्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली.

या प्रसंगी नागरिक परमेेश्वर पाटील, श्रीमंत पाटील, रमेश बिराजदार, राजशेखर कलबंडी, मौला चिद्गी, शामराव आंदेवाडी, नागू जमादार, रवी बिराजदार, कल्याणी पाटील, अल्लादिन चिद्री, महानिंग सोनकांबळे, खाजेभाई चिद्री, ग्रामसुरक्षा दल सदस्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments