मुख्यमंत्री फडणवीसांना आता हिसका दाखवावाच लागेल' - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 17, 2025

मुख्यमंत्री फडणवीसांना आता हिसका दाखवावाच लागेल'

 

मुख्यमंत्री फडणवीसांना आता हिसका दाखवावाच लागेल'





बच्चू कडूंचा इशारा

- मराठा-ओबीसी वाद एका मिनिटात सोडवू शकतात पण त्यांना तसे करायचे नाही !
- हिंदू शेतकरी आत्महत्या करतायत कुठं गेलं हिंदुत्व?

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीच्या आधी हेच देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, आमचं सरकार आलं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू. पण वर्ष झालं तरी त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांचे रक्त सांडल्याशिवाय काही करणार नसाल तर मुख्यमंत्र्यांना आता हिसका दाखवला पाहिजे, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू म्हणाले, सोलापुरातील विडी कामगार आणि मील कामगारांचा प्रश्न गंभीर आहे. येत्या 19 तारखेपर्यंत तुम्हीच आयुक्ताना वेळ द्या, त्यानंतर 20 तारीख आमची असेल. माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे, आमचे आंदोलन फार वाईट असतात.

पालकमंत्री येतात आणि रस्त्यावरून अतिवृष्टची पाहणी करतात, त्यापेक्षा तुम्हीच हेलिकॉप्टरमधून पाहणी करतात. आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः ग्राउंडवर जाऊन पाहणी करत होते. मात्र, आमचे देवाभाऊ टीव्हीवरूनच अहवाल मागवतात. उद्धव ठाकरे यांना हे ऑनलाईन मुख्यमंत्री म्हणत होते, तेच स्वतः आता ऑनलाईन झाले आहेत, असेही कडू यांनी सांगितले.

ते म्हणाले, सोलापूर उसाचा पट्टा म्हणून आम्ही पाहतो, सोलापूर जिल्ह्यात 33 साखर कारखाने आहेत, पण फक्त 9 कारखान्यांनी एफआरपी दिली. कायदा सांगतो जर FRP दिली नाही, तर जप्ती केली पाहिजे. पण, वर्ष झालं तरी शेतकऱ्यांचे 93 कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. जर पैसे देणार नसतील, तर गुन्हे दखल करा. जर तेही होणार नसेल तर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करा.

शेतकरी लुटला जात असेल तर मग आपल्या संघटनेला अर्थ उरणार नाही. काही ठिकाणी काट्याच्या, तर काही ठिकाणी रिकव्हरीच्या माध्यमातून लुटलं जातं. आमची संघटना ही शेतकरी आणि शेतमजुरांसाठी आहे. बाकीचे भांडू द्या जातीसाठी; पण आम्ही शेतकरी शेतमजूरसाठी भांडू. या सरकारने अदानी आणि अंबानींचे कोट्यवधी रुपये माफ केले आहेत. मात्र शेतकरी कर्जमाफीवर कोणी बोलायला तयार नाहीत, असेही कडू यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार कडू म्हणाले, शेतकऱ्यांचे सोयाबीनचे भाव काय आहेत, पाहा. कष्ट करून मालाला भाव मिळत नसेल तर काय फायदा? मला प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही कोणत्या जातीच्या व्यासपीठावर दिसणार का? पण, मी ठणकाहून सांगितलं की, शेतकरी, दीन दलितांच्या भल्यासाठी मी असेल. सगळे जातीसाठी लढत असले तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू.

राज्यात मराठा ओबीसी हा विषय ज्वलंत झाला आहे, त्यावर बोलताना बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आलं तर मराठा ओबीसी वाद एका मिनिटात सोडवू शकतात. परंतु त्यांना तसे करायचे नाही. फडणवीस यांनी मनावर घेतलं होतं, पुन्हा येईन, त्यामुळे ते पुन्हा आले. फडणवीस सर्वच बाबतीत तज्ज्ञ आहेत, तज्ज्ञाकडे असे प्रकरण रेंगाळत का पडलेत, असा शाब्दिक टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.

जातीजाती भांडण लावण्याचं काम व्यवस्थित सुरु
बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. हे सरकार जातीजाती भांडण लावण्याच काम करत आहेत. जाहिरातीमधून व्यवस्थित केले जात आहे. महापुरुष देखील जातीजाती वाटून दिले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज मराठयांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे तर महात्मा फुले माळ्यांचे, अहिल्यादेवी होळकर धनगरांची महापुरुष जातीजाती वाटून टाकले आहे, असा खेळ राज्य सरकारने सुरू केला आहे.

हिंदू शेतकरी आत्महत्या करतायत कुठं गेलं हिंदुत्व?
गोरक्षणाचा कायदा पारित झाल्यापासून शेतकऱ्यांना वेठीस धरलं जात आहे. गोरक्षणाच्या नावाखाली यांना कार्यकर्त्यांची पोट भरायची आहेत. सरकारला गोरक्षण करायचे आहे. तर सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे, एकत्रित गाई ठेवणाऱ्यास अनुदान दिले जाते. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे एक दोन गाई आहेत, त्यांना अनुदान दिले जात नाही. भाजपच निवडणुकीपुरता हिंदुत्व असत, बटेंगे तो कंटेंगे असा नारा देण्यात आला होता, आता कुठं गेलं यांचं हिंदुत्व, कारण हिंदू शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी टीका बच्चू कडू यांनी गोरक्षणाच्या कायद्यावर बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages