भीमा नदी व उजनी धरणातील जलप्रदूषण रोखा- खा.धैर्यशील मोहिते-पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- भीमा नदीतील वाढत्या जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (CPCB) चेअरमन वीर विक्रम यादव यांची नवी दिल्ली येथे भेट घेत निवेदन दिले. या बैठकीदरम्यान त्यांनी नदीप्रदूषणामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय आणि जनस्वास्थ्याशी संबंधित गंभीर समस्यांवर सविस्तर चर्चा केली.याशिवाय, उजनी धरण व सोलापूर परिसरात दूषित जल वापरामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या, तसेच त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी केली.
खासदार मोहिते पाटील यांनी सादर केलेल्या निवेदनात, भीमा नदीत घरगुती व औद्योगिक सांडपाण्याचा थेट विसर्ग होत असल्याने मानव आरोग्य, शेती, पशुधन आणि पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबाबत लक्ष वेधले.
त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण आणि सोलापूर येथील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे (STP) पूर्ण क्षमतेने कार्यक्षम आहेत की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, औद्योगिक प्रदुषित जल तपासणीची कार्यप्रणाली, जलप्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करावी याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नदीच्या जलगुणवत्तेच्या अहवाल सार्वजनिक उपलब्ध करावा यासंदर्भात CPCB कडून स्पष्ट व सविस्तर माहितीची मागणी केली.
या चर्चेच्या पार्श्वभूमीवर CPCB चे चेअरमन वीर विक्रम यादव यांनी या समस्येची गंभीर दखल घेतली असून, येत्या जानेवारी २०२६ मध्ये भीमा नदी व उजनी धरणातील जल प्रदूषणाबाबत केंद्रीय प्रदूषण मंडळाचे तज्ञांकडून पाहणी चाचणी करून समस्येच्या निराकरणासाठी ठोस पावले उचलली जातील असे सांगितले.
0 Comments