Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादीचे माजी आ. बबनदादा शिंदेंवर अमेरिकेत यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

 राष्ट्रवादीचे माजी आ. बबनदादा शिंदेंवर अमेरिकेत यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया




मुंबई (कटूसत्य वृत्त):- माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर अमेरिकेत जाऊन हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी त्यांना तीन महिने अगोदर अमेरिकेतील सेंट लुईस येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन राहावे लागले.

मूळचे टेंभूर्णीचे पण सध्या अमेरिकेतील सेंट लुईस येथील बी. जे. सी. हॉस्पिटलचे डीन डॉ. अमित पावले यांनी बबनदादा शिंदे यांच्यावर यशस्वीपणे हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली आहे. याबाबतची माहिती बबनदादांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी दिली.

माजी आमदार बबनराव शिंदे यांना गेली वीस वर्षांपासून हृदयविकाराचा त्रास होता. सोलापूरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांच्याकडे त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते. बबनदादांवर यापूर्वी ऑंजिओप्लॉस्टी आणि बायपासची शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. त्यांचं हृदय केवळ ३० टक्केच काम करत होतं, त्यामुळे डॉ. परळे आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांनीही त्यांना हृदयप्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता.

बबनराव शिंदे यांचा विश्वास वाढावा, हृदयप्रत्यारोपणासाठी ते सकारात्मक राहावेत, यासाठी हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या रुग्णांबरोबर त्यांची चर्चा घडवून आणली जात होती. संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेतला जात होता. याचदरम्यान टेंभुर्णीचे डॉ. अमित पावले यांच्यासोबतही चर्चा झाली.

हृदयप्रत्यारोपणाची सोय भारतात चेन्नईमधील एका हॉस्पिटलमध्ये होती. मात्र, तेथील हॉस्पिटलचा हृदयप्रत्यारोपण सक्सेस रेट ९४ टक्के आहे, तर सेंट ल्यूईसचा १०० टक्के आहे. तसेच, डॉ. गुरुनाथ परळे यांनीही अमेरिकेतील सेंट ल्यूईस येथे ऑपरेशनचा सल्ला दिला होता. त्यानुसार अमेरिकेत हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

डॉ. परळे आणि डॉ. पावले यांच्या सल्ल्यानुसार हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी माजी आमदार शिंदे हे १३ जून रोजी अमेरिकेतील सेंट लुईस येथील बी. जे. सी. हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तीन महिने डॉक्टरांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर नुकतीच १८ ऑगस्ट रोजी बबनदादांवर डॉ. पावले यांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्यांचे चिरंंजीव रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर आमदार बबनराव शिंदे यांची तब्येत व्यवस्थित असून ऑपरेशनच्या दिवशीच रोपण करण्यात आलेल्या हृदयाचे फंक्शिनिंग सुरू झाले आहे. सर्व पॅरमीटर मॅच झाले आहेत. बिपी कमी किंवा जास्त होऊ नये, यासाठी सध्या औषधं दिली जात आहेत. इन्फेक्शनची (संसर्ग) भीती कमी झाल्यावर औषधांचा मात्रा कमी होतील, असेही बबनराव शिंदे यांचे निकटवर्तीय सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे यांनी सांगितले.

इन्फेक्शनचा धोका होऊ नये; म्हणून शस्त्रक्रिया झाल्यानंतरही बबनराव शिंदे यांना पुढील तीन महिने अमेरिकेत डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याला तपासणीसाठी अमेरिकेत जावं लागणार आहे, असेही मोरे यांनी नमूद केले.

आमच्यासाठी मोठी गोष्ट : शंभूराजे मोरे

माढा तालुक्यासाठी माजी आमदार बबनराव शिंदे यांनी एवढं मोठं काम केले आहे. त्यामुळे बबनदादा आमच्याबरोबर राहावेत, अशी आमची इच्छा होती. बबनदादांवरील हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने आमची इच्छा पूर्ण झाली आहे. बबनदादांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने आमच्यासाठी पॉझिटिव्ह संदेश मिळाला आहे, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, असेही शंभूराजे मोरे यांनी नमूद केले.

Reactions

Post a Comment

0 Comments