सोलापूर जिल्ह्यात आनंदपर्वाला आजपासून सुरुवात'; घरोघरी, सार्वजनिक मंडळांत होणार बाप्पांची स्थापना; बाजारपेठा फुलल्या
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला म्हणजेच बुधवारी (ता. २७) श्री लाडक्या बाप्पाचे घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये आगमन होत आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पुढील दहा दिवस चालणाऱ्या आनंदपर्वास आजपासून सुरुवात होणार आहे. भक्तांमध्ये आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण पसरले आहे.
सलग १० दिवस चालणारा हा गणेशाचा सोहळा म्हणजे बुद्धी व समृद्धी देणारा व अडथळे दूर करणारा मानला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून देशातील नागरिकांमध्ये धर्मजागरण व राष्ट्रजागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. विविध सार्वजनिक मंडळांत व घरगुती गणेश प्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वत्र भक्तीच्या वातावरणात आला रे आला गणपती आला, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार म्हणत बालभक्त देखील गणेशाची स्थापना करण्यासाठी उत्सुक आहेत. ठिकठिकाणी विद्युत रोषणाई आणि आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत.
संपूर्ण शहर भक्तीमय आणि उत्साही वातावरणात न्हाऊन निघाले आहे. पुढील दहा दिवसांपर्यंत गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील. अनेक मंडळांनी सामाजिक संदेश देणाऱ्या थीम निवडल्या आहेत. त्यामुळे या उत्सवाला एक वेगळीच दिशा मिळणार आहे. पर्यावरणाची काळजी, ऑपरेशन सिंदूर, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, पाणी बचतीचा संदेश व धार्मिक स्थळांचे देखावे लोकांना या आनंदपर्वात पाहायला मिळणार आहेत. गणेशोत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून, तो एक सांस्कृतिक आणि सामाजिक सण आहे, त्यामुळे येत्या दहा दिवसात सोलापूरात सर्वत्र धार्मिक वातावरण असणार आहे.
कसबा गणपतीची मिरवणूक
बाळीवेस येथील कसबा गणपती मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून श्रींची स्थापना करण्यात येणार आहे. संपूर्णपणे पारंपरिक वाद्यांचा वापर करत पूर्वीपासून संस्कृती जपणारे मंडळ म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. इंडियन मॉडेल स्कूलतर्फे सकाळी ९.३० वाजता दावत चौकापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत ४७० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
तीन लाख गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना
सोलापूर शहरात सार्वजनिक मंडळ व घरांमध्ये अशा ३ लाख गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन, विजापूर रोड, दत्त नगर, अशोक चौक, मधला मारुती, बाळीवेस, टिळक चौक, कन्ना चौक, राजेंद्र चौक आदी ठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल्स चार-पाच दिवसांपासूनच सजले आहेत.
पहाटे ४.५० पासून दुपारी १.५३ पर्यंत मुहूर्त
गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला बुधवारपासून (ता. २७) प्रारंभ होत असून बुधवारी श्रीगणेश चतुर्थीला ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४.५० वाजल्यापासून ते दुपारी १.५३ वाजेपर्यंत गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे. या वेळेत आपल्या व गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना-पूजन करता येईल, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. यंदाचा गणेशोत्सव ११ दिवसांचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
श्रीगणेशाची स्थापना प्रातःकालापासून मध्याह्नापर्यंत कोणत्याही वेळी करता येते. त्यासाठी कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतरदेखील करता येऊ शकते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे, असे नाही. घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी, असे दाते यांनी सांगितले. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन पाण्यामध्ये करावे, असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याचा नियम नसल्याने तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

0 Comments