अमेरिकन साम्राज्यवादाचा निषेध, १३ ऑगस्टला देशव्यापी आंदोलन!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतविरोधी कर कारस्थानाचा तीव्र विरोध
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहेत. व्यापार वाटाघाटी सुरू असतानाही अमेरिकेकडून सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत.
रशियाकडून भारत तेल व शस्त्रास्त्रे विकत घेत असल्याने ती खरेदी थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. अन्यथा, २७ ऑगस्टपासून आणखी २५ टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कृतीतून अमेरिकन साम्राज्यवादाचा कुरूप चेहरा उघड झाला असून, भारताच्या सार्वभौमत्वावर व स्वतंत्र व्यापार धोरणांवर सरळ आक्रमण केले जात आहे.
सीटूसह सर्व कामगार संघटनांचे आवाहन आहे की, भारत सरकारने अशा कारस्थानांना बळी पडू नये. नुकत्याच झालेल्या युरोपियन युनियन व युनायटेड किंगडमसोबतच्या ‘सीईटीए’सारख्या करारांमध्ये झालेल्या तडजोडीमुळे शेती, दुग्ध व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्रावर संकट अधिक गडद झाले आहे. यामुळे ब्रिटन, युरोपियन युनियनसह साम्राज्यवादी देशांना फायदा होत असून, भारतीय शेतकरी व कामगार यांचे नुकसान होत आहे.
अशा पार्श्वभूमीवर, अमेरिकेसोबत सुरू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींमध्ये अमेरिकन अटींना मोदी सरकार बळी पडू नये, अशी मागणी सर्व कामगार संघटनांनी केली आहे. सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली दहा वर्षांचा संरक्षण करार करण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा, अशीही भूमिका व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या धमक्यांना विरोध करण्यासाठी १३ ऑगस्ट २०२५ रोजी देशव्यापी निदर्शने व डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचे आवाहन सर्व कामगार संघटना आणि संयुक्त किसान मोर्चा यांनी केले आहे. या आंदोलनात देशभक्त जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. डी. एल. कराड, प्रमुख समन्वयक – कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष सीटू, तसेच एम. एच. शेख, राज्य सरचिटणीस सीटू यांनी केले आहे.
0 Comments