जगात आई-बापाशिवाय कोणताच देव मोठा नाही- डॉ. वसंत हंकारे
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- प्रत्येकाने आपले आईबाप समजून घेणे ही काळाची गरज आहे. आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना समजून घ्या. ते आपल्यातून निघून गेल्यावर भिंतीवरच्या फोटोतून कधीच जीव लावायला परत येणार नाही याची जाणीव ठेवा. जगात आई-बापाशिवाय कोणताच देव मोठा नाही असे आवाहन प्रबोधनकार प्रा. डॉ. वसंत हंकारे यांनी केले.
नातेपुते येथील सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. डॉ. हंकारे यांचे 'न समजलेले आई-बाप' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार अँड. शिवाजीराव पिसाळ व महेश शेटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मालोजीराजे देशमुख यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू विद्यार्थिनींना २० सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना प्रमुख वक्ते वसंत हंकारे म्हणाले की, तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे. आई-वडिलांच्या शब्दाच्या पुढे जाऊ नये. आपल्या चुकीच्या कृतीमुळे आई-वडील कोणासमोर लाचार व्हायला नकोत, असे आवाहन प्रा. हंकारे यांनी केले. तुम्ही आयपीएलचे रन मोजताना हिशेब ठेवतात. मात्र ज्या आई-बापानेआपल्याला जन्म दिला, मोठे केले, अंगा खांद्यावर खेळवले त्या बापाने आपल्यासाठी हालअपेष्टांचे किती रन काढलेत याचा हिशेब तुम्ही कधी करणार? आता तो हिशेब तुम्हाला करावाच लागेल, असे त्यांनी बजावले. अई-बाबांनी लहानपणी आपल्यासाठी काय केले आहे हे तुम्हाला चांगले माहिती आहे. लहानपणी आपल्याला आई-बाप कळत होते, आता मात्र आम्ही कॉलेजला जायला लागलो महणून आमच्यावर बंधन आलीत असा तुमचा समज झाला आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला आता आवडत नाही, 'आय हेट यू, मम्मी-पप्पा' असे वाक्य मुलांच्या तोंडून येऊ लागली आहे. पण हे व्याख्यान तुमच्यासाठी परिवर्तनाचे वादळ घेऊन आले आहे. परत एकदा तुम्हाला तुमचे हरवलेले आई-बाप यातून नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद प्रा. हंकारे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे सर्व विद्यार्थी, एस एन डी इंग्लिश स्कूल, रत्नप्रभा हायस्कूल,समता इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाळांचे विद्यार्थी शिक्षक संस्थाचालक, नातेपुते परिसरातील ग्रामस्थ सर्व मान्यवर उपस्थित होते.
0 Comments