निरा नदी किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- राज्यात गेल्या तीन चार दिवसापासून, रात्रंदिवस पडणाऱ्या मुसळदार पावसामुळे,विविध धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. सातारा जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे, वीर धरणातील पाण्याची पातळी वाढली गेली आहे.यामुळे वीर धरणाचे 9 दरवाजे उघडून नीरा नदीच्या पात्रात सुमारे 60 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.नीरा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे,माळशिरस तालुक्यातील, नीरा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याने पुरपरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नीरा नदी किनारी भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.
नीरा नदी वरील सराटी पुलाजवळील बंधारा, अकलाई मंदिराजवळील बंधारा, लुमेवाडी बंधारा, वजराई बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे यावरून होणारी वाहतूक बंद पडली आहे. पाण्याला प्रचंड ओढ आणि वेग असल्याने नदी किनाऱ्यांवरील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज रात्री पर्यंत पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होणार आहे. गत काही महिन्यांपूर्वी नीरा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे माळीनगर, अकलूज, पिरळे परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. एन डी आर एफ च्या टीम बोलावून नागरिकांची सुटका करण्यात आली होती. अकलूज मधील अकलाई मंदिराच्या पायऱ्यापर्यत पाणी आले होते.
नीरा व भीमा नदीचा नीरा नरसिहपूर येथे संगम होतो. उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे 90 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आल्याने संगम, बाभुळगावं, वाफेगाव, नेवरे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे.
0 Comments