जीएसटीमध्ये मोठा बदल: 12% आणि 28% स्लॅब रद्द
नवी दिल्ली, (वृत्त सेवा):- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संरचनेत ऐतिहासिक बदल करण्यात येत आहेत. राज्यांच्या वित्त मंत्र्यांच्या समूहाने (जीओएम) केंद्र सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, ज्यानुसार सध्याचे 12% आणि 28% कर स्लॅब रद्द करून फक्त 5% आणि 18% असे दोनच कर दर ठेवण्यात येणार आहेत.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय मंत्रीगटाने हा निर्णय घेतला. नवीन प्रस्तावानुसार, अत्यावश्यक वस्तूंवर 5% तर सामान्य वस्तूंवर 18% कर आकारला जाईल. तंबाखू सारख्या अपायकारक वस्तूंवर 40% कर लावण्यात येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याआधी स्पष्ट केले होते की, “दरांचे पुनर्रचन केल्याने सामान्य नागरिक, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि एमएसएमई उद्योगांना दिलासा मिळेल आणि कर प्रणाली सुलभ होईल.”
सध्या जीएसटी अंतर्गत 0%, 5%, 12%, 18% आणि 28% असे पाच वेगवेगळे दर लागू आहेत. या बदलामुळे कर संरचना लक्षणीयरीत्या सरलीकृत होणार आहे.
0 Comments