Hot Posts

6/recent/ticker-posts

RSS च्या बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि बामसेफला संपवण्याचा कट? प्रवीण गायकवाडांचा मोठा आरोप

  RSS च्या बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि बामसेफला संपवण्याचा कट? प्रवीण गायकवाडांचा मोठा आरोप  





पुणे (कटूसत्य वृत्त):- ‘आमच्याच पोरांना हाताशी धरून आमच्याच पोरांवर हल्ले करण्याचे धाडस व्हायला लागले आहे, यालाच सत्तेचा माज म्हणतात. संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखांवर हल्ला केला, त्यांच्यावर तर कारवाई व्हायलाच हवी, मात्र या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड शोधून त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा आम्ही त्यांना सोडणार नाही' असा इशारा संभाजी ब्रिगेड व अन्य समविचारी संघटनांच्या जाहीर सभेत सोमवारी देण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या विविध संघटनांनी शिवाजी व्यायाम मंदिरासमोर सोमवारी सकाळी जाहीर सभा घेतली. त्यात हल्ल्याचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेनपासून असे प्रकार सुरू आहेत. सत्ताप्राप्ती झाल्यानंतर त्यात वाढ झाली आहे. प्रविण गायकवाड गेली अनेक वर्षे संभाजी ब्रिगेडचे नेतृत्व करत आहेत. जात पात न मानता शिवविचार केंद्रभागी ठेवून त्यांनी बहुजन समाजातील अनेक युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्याची, परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची, नोकरी करण्यापेक्षा उद्योजक होऊन नोकऱ्या देण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या याच कामाचा धसका घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोर वेगळे आहेत व त्यांना या पद्धतीने भडकावणारे वेगळे आहेत. त्यांचे हेतू चांगले नाहीत. समाजात भांडणे लावण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप यावेळी वक्त्यांनी केला.

संभाजी ब्रिगेड हे नाव आजकालचे नाही. जुने आहे. तरीही प्रविण गायकवाड यांनी त्याविषयी सुधारणा करण्याचे सांगितले होते. त्यात तांत्रिक अडचणी होत्या. मात्र विचारांची लढाई विचारांनीच करायची हेच ज्यांना मान्य नाही तेच अशा प्रकारचे हल्ला करू शकतात.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रविंद्र माळवदकर, शिवसंग्रामचे तुषार काकडे, महेश पवार, रविंद्र भोसले तसेच पुरूषोत्तम खेडेकर, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, संतोष शिंदे, गंगाधर बनबरे, मराठा सेवा संघाच्या सारिका कोकाटे, सत्यशोधक समाजाच्या प्रतिमा परदेशी, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कणसे, हर्षवर्धन मगदूम, पैगंबर शेख, शिवमहोत्सव समितीचे विकास पासलकर, विराज तावरे, प्रशांत धुमाळ, रोहन पायगुडे, सुनील माने, उदय महाले, गणेश नलावडे, किशोर कांबळे, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, नागेश खडके, रेखा कोंडे, श्रीकांत शिरोळे व अन्य अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सभेला उपस्थित होते.

अमोल मिटकरींनी दीपक काटेच्या संघटनेचा दांभिकपणा उघडा पाडला, म्हणाले, 'शिवधर्म हे नाव एकेरी नाही का?'


संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोटमध्ये शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर वंगण टाकून त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला.

गायकवाड यांच्या तोंडाला शिवधर्म प्रतिष्ठान संघटनेने काळे फासले. या हल्ल्याचे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. माझ्यासह पुरोगामी विचार मंडणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव कांबळे नावाच्या आमच्या मित्राने मुंबईत रजिस्टर केलं आहे. टेक्निकल अडचण आहे. आता तो म्हणतो की, छत्रपती म्हणण्याचा आग्रह धरणाऱ्या दीपक काटेच्या संघटनेचे नाव शिवधर्म हे एकेरी नाही का? आता बजरंग दल हे नाव देखील एकेरी नाव आहे. त्याचा उल्लेख देखील श्री बजरंग दल करायला हवं ना? ज्यावेळी कोरटकर, राहुल सोलापूरकर शिवाजी महाराजांवर बोलत होते त्यावेळी ही संघटना कुठे गेली होती, असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला.

मी सभागृहात आज विषय मांडणार आहे. जनसुरक्षा विधेयकाचा निमित्ताने यांनी कट्टर डाव्या संघटनांवर बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हीदेखील कट्टर उजव्या संघटनांवर बंदी आणण्याचा विचार करणार आहोत, असे मिटकरी यांनी म्हटले.

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत आहे. माझं देवेंद्र फडणवीसांना आवाहन आहे की, नरेंद्र मोदी , अमित शहांनी किमान पंचवीस वेळा शिवाजी महारांचा एकेरी उल्लेख केलाय. मी व्हिडीओ देतो. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा. माझं मुख्यमंत्री आणि अजित पवारांना आवाहन आहे की , जनसुरक्षा विधेयकाच्या अंतर्गत पहिली कारवाई दिपक काटे याच्यावर झाली पाहिजे. जशास तसे उत्तर दिले जाईल. तुरुंगात जायची तयारी आहे‌. सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले.

मराठा हा शब्द संकुचित करण्यात आला आहे. फक्त संभाजी ब्रिगेडच नाही तर पुरोगामी संघटना एकत्र यायच्या. पण आपापसात मतभेद व्हावेत यासाठी आरएसएसवाले काम करतात. रेशीम बागेकडून फुट पाडली जाते. प्रविणवरील हल्ल्याचा बदला घ्यायचा असेल तर आपण एकत्र आलो पाहिजे. संघटनेत नवे तरुण आले पाहिजेत , तरच क्रांती होईल, असे मत संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.

चौकट-

भाजपच्या पदाधिकाऱ्याने भ्याड हल्ला केला, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं- अमोल कोल्हे

गेली अनेक वर्ष पुरोगामी विचार मांडणारे, सर्वसामान्य बहुजन तरुणांच्या डोळ्यात उद्योजकतेची स्वप्न पेरण्याचे काम प्रविणदादा करत आहेत. त्यांची वैचारीक बैठक आहे, एक विचारधारा आहे. खूप वाचनातून आणि चिंतनातून ती समोर आली आहे. तुमचे त्यांच्याशी वैचारीक मतभेद असू शकतात. पण त्यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला हा भ्याड आहे. ज्यांनी हे कृत्य केले तो भाजपचा पदाधिकारी असल्याचे कोल्हे म्हणाले. याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षाने दिले पाहिजे असे कोल्हे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हे यांनी केली. कोणत्याही आरोपीला पाठिशी घालू नये असे कोल्हे म्हणाले. प्रविणदादा यांच्यावर झालेला हल्ला हा वैचारीक दिवाळखोरीचं लक्षण असल्याचे कोल्हे म्हणाले.

चौकट-

हल्लेखोरांना पकडून कठोर शिक्षा करा अन्यथा...मनोज आखरेंनी दिला इशारा

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. हल्लेखोरांना पकडून कठोर शिक्षा करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड मनोज आखरे यांनी केली आहे.नाही तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईल उत्तर देईल. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांना जशास तसा धडा शिकवावा.

चौकट-
RSS च्या बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि बामसेफला संपवण्याचा कट? प्रवीण गायकवाडांचा मोठा आरोप

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या संघाच्या बैठकीत बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला असून, अक्कलकोट येथे त्यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेमागेही असाच नियोजनबद्ध कट असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

चौकट-
प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या काटेकडे बंदूक होती- रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात काळा शर्ट परिधान करून झुंडशाहीविरोधातील पोस्टरसह उपस्थिती दर्शवली. माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, प्रवीण गायकवाड हे पुरोगामी विचार मांडणारे कार्यकर्ते आहेत आणि याच विचारधारेवरून त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांनी दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचा संदर्भ देत सांगितले की, पुरोगामी विचार न झेपल्यामुळेच अशा घटनांना जन्म मिळतो. त्यांनी आरोप केला की हल्लेखोर दीपक काटेकडे बंदूक व 28 काडतुसे सापडली असून, गायकवाड यांना ठार मारण्याचा प्रयत्नच झाला असावा. इतकेच नाही, तर काटे याने पूर्वी स्वतःच्या भावालाही मारहाण केल्याचा गंभीर आरोपही पवार यांनी केला.

चौकट-
भाडोत्री मवाली हाताशी धरून शिवफुलेशाहूआंबेडकरी विचारधारा संपवण्याचा कट रचला- किरण माने

…असे विचार पेरणारी माणसं हा मनुवाद्यांच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. म्हणूनच भाडोत्री मवाली हाताशी धरून शिवफुलेशाहूआंबेडकरी विचारधारा खचवण्याचा आणि संपवण्याचा कट रचला भिकमंग्यांनी. अरे अनाजीपंताच्या बुळग्या औलादींनो, हल्ला झाला की शेपूट घालून लपून बसायला ही कोरटकरी-सोलापूरकरी जमात नाही. तुमच्या बापजाद्यांनी केलेल्या कारस्थानाच्या नाकावर टिच्चून रूबाबात सिंहासनावर बसलेल्या महान लढवय्याचं रक्त आहे हे.

इतिहास साक्षी आहे, शिवफुलेशाहूआंबेडकरी विचार कुठल्याही सत्तेपेक्षा मोठा आहे. भुमिपुत्राला हलक्यात घेऊ नका उपऱ्यांनो. लावा ताकद. जय शिवराय… जय भीम !

Reactions

Post a Comment

0 Comments