दत्तकला शिक्षण संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- “ विकसित भारत सन्मान २०२५” या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांतर्गत, स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेला ग्रामीण भागात तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘Excellence in Rural Education Development’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास मधुकर झोळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ते म्हणाले, “हा पुरस्कार ग्रामीण भागात शिक्षणाच्या माध्यमातून घडवलेल्या सकारात्मक परिवर्तनाची राष्ट्रीय पातळीवर घेतलेली दखल आहे. ही संस्था म्हणजे केवळ शिक्षणसंस्था नाही, तर ग्रामीण युवकांच्या सशक्तीकरणाचे एक केंद्र आहे.” हा सन्मान हा फक्त संस्थेचा नाही, तर ग्रामीण भारताच्या शैक्षणिक परिवर्तनाचा सन्मान आहे. आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहोत. संस्थेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य या यशामागे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
"विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना ग्रामीण भागातील युवक व नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आम्हाला मोलाचे योगदान देता आले, ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची व अभिमानास्पद बाब आहे."
संस्था गेली १७ वर्षे ग्रामीण आणि दुर्लक्षित भागात तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची दारे खुली करून हजारो विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटा उघडून देत आहे. शैक्षणिक गुणवत्ता, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर आधारित उपक्रमांमुळे संस्थेने एक आदर्श उभारला आहे.
या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्यास राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली असून, भविष्यात आणखी प्रभावी शैक्षणिक प्रकल्प राबवण्याचा निर्धार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments