Hot Posts

6/recent/ticker-posts

आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी

 आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी





मुंबई (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे.

विधानभवनाच्या लॉबीतच दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली आहे. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याने ही मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

काल देखील जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये वाद झालेला होता. कालचा वाद हा शिवागाळ करण्यापर्यंत होता. मात्र, आज .विधानभवनाच्या लॉबीतच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. यामुळं विधानभवन परिसरात काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, या विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली आहे. विधानभवनात येताना अडचणी येत असल्याचे आमदार सना मलिक यांनी आरोप केला आहे.

विधानसभेत आमदार सुरक्षीत नसतील तर कशाला राहायचं आमदार? आव्हाडांचा संतप्त सवाल

पहिल्यांदा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आम्हाला याच्यापेक्षा जास्त पुरावा देण्याची गरज नसल्याचे आव्हाड म्हणाले. जर तुम्ही विधानसभेत गुंडाना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर कोणतेच लोक सुरक्षीत नाहीत असे आव्हाड म्हणाले. मला शिव्या दिल्या आहेत. कुत्रा, डुक्कर, तुला मारुन टाकू अशा धमक्या दिल्याचे आव्हाड म्हणाले. मलाच मारण्यासाठी सगळे आले होते असा आरोप आव्हाड यांनी केला. विधानसभेत आमदार सुरक्षीत नसतील तर कशाला राहायचं आमदार? असा संतप्त सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तो मवाल्यासारखा येतो आणि आमच्या आया बहिणीवरुन शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लॅग्वेंज म्हणून डिक्लेर करा ना असे म्हणत आव्हाडांनी पडळकरांवर टीका केली. सत्तेचा एवढा माज असे म्हणत आव्हाड चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, या घटनेनंतर प्रसारमाध्यमांनी गोपीचंद पडळकर यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मला याबाबत काही माहिती नसल्याचे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे. त्याला जाऊन भेटा असे पडळकर म्हणाले. तो तिथं आहे, त्याच काय झालं तिथं जाऊन बघा, माझ्या ओळखीचा नाही असे पडळकर म्हणाले. तिथं गर्दी खूप आहे, नेमकं काय झालं याची मला माहिती नसल्याचे म्हणत पडळकर यांनी या घटनेवर बोलण्यास नकार दिला आहे.

मारहाण करणारे समर्थक आहेत की गुंड? उद्धव ठाकरेंचा सवाल

मारहाण करणारे समर्थक आहेत की गुंड आहेत? असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ज्यांनी त्यांना पास दिला त्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. अशी मारामारी, आमदारांनी धक्काबुक्की होते असेल ही घटना विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर गृहमंत्र्यांनी ताबडतोब सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्यांच्या पोशिंद्यावर कडक कारवाई केलीच पाहीजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर मारामारी होत असेल तर विधानभवनाचं महत्व राहिलं काय? कडेकोट बंदोबस्त असताना हे गुंजड कसे आले होते. यांना कोणी पास दिले होते, याची चौकशी झाली पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांनी अहवाल मागितला

दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अहवाल मागितला आहे. याबाबत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, मी अहवाल मागितला आहे, अहवाल प्राप्त झाल्यानंतर उचित कारवाई करेल असे नार्वेकर म्हणाले. विधीमंडळातील सदस्यांची सुरक्षेची जबाबदारी माझी आहे. त्यासंदर्भात उचीत कारवाई मी करेन असे नार्वेकर म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments