बार्शी उपसासिंचन योजनेतून माढा तालुक्यातील गावांना पाणी सोडावे - रणजितसिंह शिंदे
माढा (कटूसत्य वृत्त):- सध्या उजनी धरणात 70% च्या आसपास पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा ऋतू सुरू असल्याने धरणातून भीमा-सीना बोगदाद्वारे मागील काही दिवसांपासून पाणी खाली सोडले जात आहे.हे नाहक वाया जाणारे पाणी जोड कालव्यातून कार्यान्वित केलेल्या बार्शी उपसासिंचन योजनेतून माढा तालुक्यातील भूमिगत पाईपलाईनचे काम पूर्ण व उन्हाळ्यात टेस्टिंग चाचणी यशस्वी झालेल्या गावांना सोडून तेथील पाझर व साठवण तलाव,सिमेंट बंधारे, ओढे व शेततळी पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे अमेरिकेतून फोनवरून जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह यांनी केली आहे.
मे व जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावली परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात येऊ लागली आहेत. ऊस व फळबागांची संगोपन करणे अवघड झाले आहे.या पार्श्वभूमीवर बार्शी उपसासिंचन योजनेतून माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे,वडाचीवाडी (अं.उ),जामगाव, तांदूळवाडीचा काही भाग व दारफळ सीनाच्या पूर्व भागातील पाझर व साठवण तलाव,बंधारे,ओढे,नाले व शेततळी पूर्ण क्षमतेने भरून घ्यावीत जेणेकरून शेतीतील उभी पिके व फळबागांचे संगोपन होईल.सीना नदीतून सध्या मोठ्या प्रमाणावर नाहक वाहून जाणारे पाणी या कमी पावसाच्या भागातील विविध जलाशयात सोडले तर भूजलपातळी वाढण्यास नक्कीच मदत होईल.या भागातील शेतकऱ्यांनीही आमच्याकडे पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे.ही वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे रणजितसिंह शिंदे यांनी सांगितली तेंव्हा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेऊन उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसांत बार्शी उपसासिंचन योजनेतून माढा तालुक्यातील विविध गावांना भूमिगत पाईपलाईनद्वारे सीना नदीतील पाणी मिळणार आहे. उन्हाळ्याच्या आवर्तनाच्या वेळी फक्त यशस्वी टेस्टिंग झाली होती परंतु सर्व पाझर व साठवण तलाव,ओढे,नाले, बंधारे भरले नव्हते त्यामुळे हा भाग पाण्यापासून वंचित राहिला होता.किमान आता तरी उजनी धरणात भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे बार्शी उपसासिंचन योजनेतून पाणी सोडून या भागाला न्याय द्यावा अशी मागणी रणजितसिंह शिंदे यांनी केली आहे.
0 Comments