शंकरनगर येथे हजारों महिलांनी लूटला पारंपारिक खेळाचा आनंद
अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाशिवरात्री यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर यांच्यावतीने ट्रस्टचे अध्यक्ष व ग्रामीण संस्कृतीचे जोपासक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २८ व २९ जूलै २०२५ रोजी शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिर परिसरात आयोजित केलेल्या नागपंचमी सण सोहळ्यात दोन दिवसांत सुमारे ५० हजारां पेक्षा अधिक मुली व महीलांनी पारंपारीक खेळाचा आनंद लुटला.
या सोहळ्यात सौ.सुलक्षणादेवी मोहिते पाटील,सौ.सुमित्रादेवी खानविलकर, आयोजिका कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील, सौ. ऋतुजादेवी मोहिते पाटील, सौ शिवांशिका मोहिते पाटील, कु.ईशिता मोहिते पाटील, कु. कृष्णप्रिया मोहिते पाटील यांनीही सहभाग घेऊन उपस्थित महिलांना प्रोत्साहन दिले.
या वेळी बोलताना कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, महिलांना पारंपारिक खेळाचा आनंद मिळावा, आपली संस्कृती जोपासावी या साठी सदरच्या सोहळ्याचे आयोजन केले आहे. महिलां,मुलींनी पारंपारिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन पारंपारिक खेळाचा मनमुराद आनंद लुटला.व भव्य स्वरूपात हा सोहळा साजरा झाला.
नागपंचमी सणसोहळ्यात महिलांनी झोका, फेर, फुगडी,झिम्मा, पिंगा, काठवठकणा या सह विवीध पारंपारिक खेळ खेळले. मंदिर परिसरात २५ हजार स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ मंडप उभारला होता.परिसरात वारुळ, झोके, यासह महिलांना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट तयार केले होते. यामध्ये बुरुज व घोडे, बैलगाडी, ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारी घरे आदींना महिलांनी दाद दिली. अल्प दरातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि नाच ग घुमा, पोरी पिंगा, गवर मंदी गवर बाई, शिव शंभूचा हार गळ्यातील, वारुळाला पुजुया अशा ग्रामीण व पारंपारीक गीतांनी परिसर आल्हाददायक व आनंददायी झाला होता. येथे उभारण्यात आलेली दहीहंडी देखील महिलांनी थर लावून जल्लोषात फोडली. परिसरात पारंपारिक सणाचे वातावरण तयार झाले होते. या वेळी महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती.
चौकट..
आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात नवीन पिढीतील मुलींना भारतीय संस्कृती,सण व पारंपारीक खेळांची ओळख व्हावी. या साठी सोहळ्याचे आयोजन केले आहे.येथून पुढे दरवर्षी नागपंचमी सणा निमित्त हा सोहळा शिवपार्वती मंदिर शंकरनगर येथे साजरा होणार आहे.
--जयसिंह मोहिते पाटील.( अध्यक्ष, महाशिवरात्र यात्रा समिती शंकरनगर अकलूज)
0 Comments