नवीन पोस्ट ऑफिसेस व बीएसएनएल सेवा तात्काळ सुरू करण्याची खा. मोहिते पाटील यांची मागणी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघामधील अनेक गावांमध्ये पोस्ट ऑफिसेस नाहीत त्याचबरोबर बीएसएनएलची सेवा देखील उपलब्ध नाही त्यामुळे तात्काळ या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे दिल्ली येथे भेटून निवेदन सादर करून केली आहे.
या संदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पोस्ट ऑफिस
उपलब्ध नाहीत त्यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पोस्ट ऑफिसची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण विकासात मोठा अडथळा निर्माण होत आहे यासाठी सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये पोस्ट ऑफिस नाहीत तेथे तत्काळ नवीन शाखा पोस्ट ऑफिस उघडण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी त्याचबरोबर बीएसएनएल संदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, सातारा आणि सोलापूर
जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी डोंगराळ क्षेत्र आहे या गावांमध्ये रेंज चा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नेटवर्कची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील लोकांना डिजिटल च्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तरी फोर जी सेंचुरेशन योजना अंतर्गत अशा ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यात यावे याचा लोकांना लाभही मिळेल आणि बीएसएनएलचे ग्राहकही वाढतील अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे निवेदन सादर करून केली आहे.
0 Comments