सोलापूर जिल्ह्यातील ४०० पेक्षा जास्त गावांमध्ये हातभट्टीची खुलेआम विक्री
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हातभट्टीचा जिल्हा ही सोलापूरची राज्यभरातील ओळख कायमची मिटावी, हातभट्टीच्या आहारी गेलेले गावागावातील तरुण व्यसनमुक्त व्हावेत, नवविवाहितांचा संसार सुखाचा व्हावा, याची जबाबदारी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागावरच अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी ३२ हजारांवर लोकांचा मृत्यू होतो, त्यात हातभट्टी तथा दारूच्या व्यसनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी दारूबंदीचे ठराव देखील केले आहेत. तरीसुद्धा जिल्ह्यातील ४०० पेक्षा जास्त गावांमध्ये हातभट्टी खुलेआम विकली जाते हे विशेष. राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामीण पोलिसांनी या गावांची यादी देखील तयार केली होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर्षी १ जानेवारीपासून साडेचार कोटींची तर ग्रामीण पोलिसांनी ४२ लाखांची हातभट्टी दारू व गुळमिश्रित रसायन नष्ट केले आहे. पोलिस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने ज्या ज्या वेळी हातभट्ट्यांवर कारवाई केली, त्यावेळी त्यांना पेटलेल्या हातभट्टी दिसल्याच आहेत. तरीदेखील, कारवाईत सातत्य नाही. पोलिस म्हणतात, 'हातभट्टींवरील कारवाई हा आमच्या कामाचा प्रमुख भाग नाही' आणि राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी म्हणतात, 'हातभट्टीशिवाय दुसरी देखील कामे आम्हाला असतात'. मनुष्यबळ कमी असल्याचेही कारण दोन्ही विभागाकडून दिले जाते. त्यामुळे गावागावात अवैध हातभट्टी व्यावसायिक वाढत आहेत. प्रशासकीय भाग सोडून या दोन्ही विभागांनी सामाजिक बांधिलकीतून पाहिल्यास निश्चितपणे हातभट्टीच्या व्यसनातून गावागावातील हजारो तरुण बाहेर येतील, असा विश्वास सर्वांनाच आहे.
चौकट
विवाहितांची भरोसा सेलकडे धाव, पण...
सोलापूर शहर-जिल्ह्यात दरमहा सरासरी ४५० विवाहिता सासरच्या विशेषतः: पतीच्या त्रासाला कंटाळून पोलिसांकडील भरोसा सेलमध्ये तक्रारी करतात. बहुतेक तक्रारींमागे हुंडा, चारित्र्यावरील संशय यासह पतीचे दारू पिऊन भांडणे, अशीच कारणे आहेत. तरीसुद्धा त्या गावांमधील हातभट्टी ना पोलिसांना ना राज्य उत्पादन शुल्क विभागाला बंद करता आली.
मद्यपानामुळे यकृत खराब होऊन मृत्यू अधिक
दारूचे विशेषतः गावठी हातभट्टीचे सतत सेवन केल्याने लिव्हर सिरॉसिस होतो. त्यामुळे पोटात पाणी होते, पचनशक्ती कमी होऊन सतत उलटीचा त्रास होतो. दारू हे एकप्रकारचे ड्रग्ज असून त्यातून यकृतला (लिव्हर) जास्त काम लागते आणि ते खराब होते. दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात विविध कारणांमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये यकृतच्या संबंधित आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ६ ते ७ टक्के आहे. त्यात मद्यपींची संख्या अधिक आहे.
0 Comments